हंगामी पोलिस निरीक्षक आले काय अन्‌ गेले काय; चोरांना फावते

विजय बागल
Friday, 27 November 2020

दोंडाईचा शहरासह परिसरातील वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस निरीक्षकांचा बंगला पोलिस निरीक्षक यावा, यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत असून, आठ वर्षांपासून तो रिकामा पडला आहे.

निमगूळ (नंदुरबार) : दोंडाईचा शहरात धाडसी चोऱ्यांसह दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यास पोलिसांना अपयश येत आहे. पोलिस निरीक्षकपद टिकाऊ नसल्याने शहरावर अनेक वर्षांपासून पोलिसांचा वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस निरीक्षक आले, की लागलीच जाण्याच्या तयारीत असतात. त्‍यामुळे ठोस कोणतीही कारवाई होत नाही. याचाच फायदा चोरटे घेत आहेत. 
दोंडाईचा शहरासह परिसरातील वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस निरीक्षकांचा बंगला पोलिस निरीक्षक यावा, यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत असून, आठ वर्षांपासून तो रिकामा पडला आहे. तेथे येणारे पोलिस निरीक्षक राहत नाहीत, म्हणून बंगला बेवारस पडला आहे. जे पोलिस निरीक्षक येतात त्यांची फॅमिली पुणे, मुंबई, नाशिककडे असल्याने भाड्याच्या बंगल्यात राहतात. काही महिन्यांसाठी असल्याने त्या बंगल्यात राहणे नको आणि कामही करणे नको, अशी स्थिती आहे. योग्य कामगिरी न करता काही महिन्यांतच ते काढता पाय घेतात. 

पोलिस कर्मचारी घेतात फायदा 
पोलिस निरीक्षक नसल्याने पोलिस कर्मचारी काम करत नाहीत. वेळेवर हजेरी न लावणे, गणवेशात न येणे, योग्य कारवाई न करता विल्हेवाट लावणे, परस्पर दांड्या मारणे, अशी अनेक कामे कोणाच्या नजरेस न पडता होत आहेत. लॉकडाउन काळात किमान २५ चोऱ्या झाल्या. काही नजरेस आल्या, तर काहींचा पंचनामा झालाच नाही. २१ नोव्‍हेंबरला गॅस गुदामात २० लाखांच्या आत मुद्देमालाची चोरी झाली. त्यानंतर २२ नोव्‍हेंबरला परत नेहमी गजबजलेल्या दादासाहेब रावल बाजार समितीच्या गाळ्यातील दोन दुकाने फोडली. ग्रामीण भागातही दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. दोंडाईचा शहरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar temparary police officer continue