नंदुरबार जिल्ह्यात आणखी तीन "कोरोना पॉझिटिव्ह'; बाधितांची संख्या 7 वर

नंदुरबार जिल्ह्यात आणखी तीन "कोरोना पॉझिटिव्ह'; बाधितांची संख्या 7 वर

नंदुरबार : जिल्ह्यात मंगळवारी (ता. 21) रात्री आणखी तीन रुग्णांचा अहवाल "कोरोना पॉझिटिव्ह' आला. त्यामुळे जिल्ह्यात "कोरोना'बाधित रुग्णांची संख्या 7 वर गेली आहे. शहादा शहरातील दोन तर अक्कलकुवामधील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. यामध्ये शहादा शहरातील 31 वर्षीय तरुण व 45 वर्षीय महिला तसेच अक्कलकुवा येथील 32 वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता घरातच राहून काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

शहादा शहरात नगरपालिका हद्दीत "कोरोना' बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून, "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले असून, त्यास लागून असलेला भाग "बफर झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच 25 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत शहरातील वैद्यकीय सुविधा आणि औषधी दुकाने, शासाकीय धान्य गोदामे (जीवनावश्‍यक वस्तू) वगळता सर्व प्रकारचे आस्थापने, दुकाने बंदी आदेश प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांनी जारी केला आहे. सोबत खबरादारीचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. हा आदेश संपूर्ण शहादा शहराच्या क्षेत्र व सीमा भागाकरिता लागू राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

प्रतिबंधात्मक केलेले क्षेत्र.. 
जनता चौक, बागवान गल्ली, इकबाल चौक, क्रांती चौक, पिंजारी गल्ली, दातार चौक, गुजर गल्ली, मेन रोड, तूप बाजार, जवाई पुरा, भावसार मढी, सोनार गल्ली, साळी गल्ली, जुना प्रकाशा रोड, नगरपालिका रुग्णालय, गांधीनगर, भाजी मार्केट, बसस्थानक परिसर, शास्त्री मार्केट, आचार्य तुलसी मार्ग, अंबाजी मंदिर परिसर, हाजी इसहाक मेमन मिल कंपाऊंड परिसर, काका का ढाबा परिसर, आंबेडकर चौक, चांभार वाडा परिसर, पाणी टाकी चार रस्ता व नगरपालिका परिसर आदी क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रात वैद्यकीय सुविधा वगळता इतर वाहनास येण्या-जाण्याचा बंदी राहणार आहे. 

बफर झोन 
उत्तरेकडील महावीर चौक, मारवाडी गल्ली, तकिया बाजार, टेक भिलाटी, गौसियानगर, खेतिया रोड, मिरानगर पाडळदा रोड, पश्‍चिम भागातील अमरधाम, लुम गल्ली, पिंगाना पूल, आझाद चौक, कुकडेलमधील सरदार पटेलचौक, गुजर गल्ली, शिवाजी चौक, जुना प्रकाशा रोड. तर दक्षिण भागातील गांधीनगर, एचडीएफसी बॅंक, विकास हायस्कूल परिसर, स्टेट बॅंक परिसर, स्वामी समर्थ मंदिर परिसर त्याचबरोबर पूर्व भागातील महालक्ष्मी नगर, नितीन नगर, पटेल रेसिडन्सी रोड, सिद्धी मंदिर परिसर,कोर्ट परिसर, जुने तहसील परिसर आदी भाग बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

अक्कलकुवा येथे बंदोबस्त 
अक्कलकुवा येथील 32 वर्षीय महिलेचा अहवाल "कोरोना पॉझिटिव्ह' आल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये गुजरात सीमेवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, नागरिकांना देखील घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com