केंद्र सरकारच्‍या निषेधार्थ नंदुरबारमध्ये ट्रॅक्टर रॅली !

धनराज माळी
Tuesday, 10 November 2020

नंदुरबार बाजार समितीपासून रॅलीला सुरवात झाली. अंधारे स्टॉप ते नाट्यमंदिर परिसरादरम्यान रॅली जात असताना, काही काळ वाहतूक खोळंबली होती.

 नंदुरबार  ः केंद्र सरकारने केलेली शेतकरीविरोधी विधेयके रद्द करावीत, कामगारांना संरक्षण द्यावे यांसारख्या विविध मागण्यांसाठी सोमवारी नंदुरबार जिल्हा काँग्रेसतर्फे किसान बचाव रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातून अडीचशेवर ट्रॅक्टरांसह शेतकरी सहभागी झाले होते. रॅलीचे नेतृत्व पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात दिलेल्या घोषणांनी शहर दणाणले होते. 

जोपर्यंत शेतकरीविरोधी कायदे केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेसतर्फे नंदुरबार जिल्ह्यात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. रॅलीमध्ये नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी पानगव्हाणे, जिल्‍हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, कॉँग्रेस नेते विश्वास पाटील, अशोक पाटील, नरेश पवार, योगेश चौधरी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

वाहतूक रखडली 
नंदुरबार बाजार समितीपासून रॅलीला सुरवात झाली. अंधारे स्टॉप ते नाट्यमंदिर परिसरादरम्यान रॅली जात असताना, काही काळ वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी नियोजन करून वाहतूक सुरळीत केली. रॅलीदरम्यान काही बस अंधारे स्टॉप येथेच थांबविण्यात आल्या. त्या बाजार समितीमार्गे शहादा बायपासने मार्गस्थ करण्यात आल्या. 

धडगाव येथे रॅली 
धडगाव : येथेही केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेस कमिटीच्या धडगाव पदाधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. रॅलीत जिल्हा परिषद सभापती रतन पाडवी, काँग्रेसचे धडगाव तालुकाध्यक्ष रेहंज्या पावरा, उपाध्यक्ष विक्रम पाडवी, जिल्हा सरचिटणीस हारसिंग पावरा, जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग तडवी, जान्या पाडवी, सुनील पाडवी, गीता पाडवी, विजया पावरा, युवाध्यक्ष तुकाराम पावरा व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar tractor rally in nandurbar to protest against central government