शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइनच करा : आमदार रावल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धनराज माळी
Monday, 20 July 2020

ऑफलाइन पद्धतीने बदल्या केल्यास त्यात मानवी हस्तक्षेप होऊन गैरप्रकार होऊ शकतात. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या या ऑनलाइन पद्धतीनेच होणे गरजेचे आहे. 

नंदुरबार  : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करून तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बदल्यांमागे होणारी आर्थिक देवाणघेवाण रोखली होती; परंतु सद्यःस्थितीत या सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑफलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे यामध्ये मोठी देवाणघेवाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून केली आहे. 

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम वसंत काळे, राज्यकार्यकारिणी सदस्य रामकृष्ण बागल, जिल्हा संघटनमंत्री राकेश आव्हाड यांच्या शिष्टमंडळाने आमदार जयकुमार रावल यांची शनिवारी (ता. १८) प्रत्यक्ष भेट घेत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने होण्याबाबत लेखी निवेदन दिले. निवेदनाची दखल घेत आमदार रावल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याबाबत पत्र देऊन मागणी केली असल्याची माहिती राज्य सहकार्यवाह काळे यांनी दिली. 

शासनाच्या ग्रामविकास विभागाने १५ जुलैस आदेश काढून राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या बदल्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार ३१ जुलै २०२० पूर्वी ऑनलाइन पद्धतीने कराव्यात, असे निर्देश दिले आहेत. परंतु ऑफलाइन पद्धतीने बदल्या केल्यास त्यात मानवी हस्तक्षेप होऊन गैरप्रकार होऊ शकतात. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या या ऑनलाइन पद्धतीनेच होणे गरजेचे असल्याबाबत लेखी निवेदनाद्वारे शासनास अवगत करण्यात आल्याची माहिती आमदार रावल यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिली. 

समितीसमोरही ऑनलाइनचीच मागणी 
ऑनलाइन जिल्ह्यांतर्गत बदल्या करत असताना २०१८-१९ व २०१९-२० च्या बदल्यांमध्ये रॅँडम राउंडमध्ये व विस्थापित बदल्यांमध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांना ऑनलाइन बदल्यांत विनाअट प्राधान्याने बदलीची तरतूद असावी. तसेच महिला शिक्षकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. राज्य शासनाने फेब्रुवारी २०२० मध्ये राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणावर पुनर्विचार करून निर्णय घेण्यासाठी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने राज्यस्तरावर आणि विभागीय स्तरावर शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. चर्चेत राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सर्व प्रतिनिधींनी जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच कराव्यात अशी, एकमुखी मागणी केलेली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Transfer teachers online MLA Rawal's demand to the Chief Minister