
कोरोना संकटात उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने अनेकांचे रोजगार गेले. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी एप्रिलपासून शासनाने थाळीची किंमत पाच रुपयापर्यंत कमी केली.
नंदुरबार : राज्य सरकारच्या शिवभोजन योजनेमुळे कोरोना संकटात गरीब व गरजूंना अल्पदरात भोजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील १३ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत साडेतीन लाखांपेक्षा अधिक थाळ्यांचे वितरण झाले आहे.
आवर्जून वाचा- दररोज दर्शन देणारा बिबट्या अखेर अडकला; पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी
ग्रामीण भागातील नागरिक कामानिमित्त शहरात येतात. त्यांना भोजनासाठी अधिक खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी १ जानेवारी २०२० पासून शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. दोन चपात्या, भाजी आणि वरण-भात समाविष्ट असलेल्या थाळीचा दर शहरी भागासाठी ५० रुपये आणि ग्रामीण भागासाठी ३५ रुपये निश्चित करण्यात आला. सुरवातीस दहा रुपये प्रतिथाळीप्रमाणे भोजन देण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. शिवभोजन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शिवभोजन थाळीचे वितरण करणे बंधनकारक आहे. सुरवातीला जिल्हा मुख्यालयी सुरू केलेल्या या योजनेचा विस्तार तालुका स्तरापर्यंत करण्यात आला आहे.
कोरोना संकटात उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने अनेकांचे रोजगार गेले. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी एप्रिलपासून शासनाने थाळीची किंमत पाच रुपयापर्यंत कमी केली. थाळीची उर्वरित रक्कम शासनातर्फे अनुदान देण्यात येत असल्याने अत्यंत कमी दरात नागरिकांना शिवभोजन केंद्रातून भोजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात दहा रुपये दराने १६ हजार ४९७ आणि पाच रुपये दराने तीन लाख ४१ हजार थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.
आवश्य वाचा- दिलासादायक; नंदूरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ कोटींची मदत
एका थाळीमागे शासनातर्फे ४० रुपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यातील १३ केंद्रांद्वारे रोज दीड हजार थाळ्यांचे वितरण करता येते. शासनातर्फे आतापर्यंत एक कोटी आठ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. अत्यंत कमी दरात भोजनाची सुविधा झाल्याने नागरिकही या सुविधेचा लाभ घेताना समाधान व्यक्त करीत आहेत.
राज्यात ९०७ शिवभोजन केंद्रे
राज्यात एकूण ९०७ शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. आतापर्यंत दोन कोटी ५३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना योजनेचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे मार्चपर्यंत प्रतिमाह पाच ते सहा लाख असणारी थाळ्यांची संख्या कोरोना कालावधीत प्रतिमाह ३० लाखांपर्यंत पोचली. कोरोना काळात पाच रुपये दराने थाळी मिळत असल्याने गरजूंना त्याचा लाभ झाला.
संपादन- भूषण श्रीखंडे