esakal | युरियासाठी रांगा; सर्वत्र लिंकिगची होतेय सक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

uriya

दोंडाईचा येथे मागणीप्रमाणे रॅक लागत नाहीत, त्यामुळे नवापूर तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. कृषी दुकानदार दरफलकांवर खतांची मूळ किंमत लिहितात, मात्र घेताना ऐंशी ते शंभर रुपये जास्त दर आकारतात. खतांची टंचाई खरी आहे की कृत्रिम हे जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व खासदार यांनी तपासून पहावी. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. 
- जालमसिंग गावित, माजी पंचायत समिती सदस्य, नवापूर 

युरियासाठी रांगा; सर्वत्र लिंकिगची होतेय सक्ती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नंदुरबार : जिल्ह्यात पुरेसा खतांचा साठा असून युरियाचा स्टॉकही गरजेपेक्षा जास्त आहे असे प्रशासना एकिकडे सांगत असले तरी युरिया खत सहजासहजी शेतकऱ्यांना मिळत नसून त्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. त्याचबरोबर इतर विद्राव्य खतांची लिंकिगची सक्ती करण्यात येत आहे. हे खत घेतले तरच युरिया मिळेल असे जिल्ह्यात ठिकठिकाणच्या विक्रेत्यांकडून सांगितले जात असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यांच्या या म्हणण्याची प्रशासन दखल घेणार आहे का त्याची अशीच पिळवणूक होऊ देणार आहे अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी आज शहादा येथे व्यक्त केल्या. तळोदा, नवापूर आणि नंदुरबारलाही परिस्थिती यापेक्षा वेगळी नसल्याचे दिसून आले. 
 
यंदाच्या खरिप हंगामाच्या सुरवातीला जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासणार नाही असे सांगत पुरेसासाठा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यांच्या या म्हणण्याला छेद देत अनेक विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची पुळवणूक सुरू केली आहे. पाऊस बऱ्यापैकी झाल्याने जवळपास साठ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. त्यामुळे पिकांना योग्यवेळी खते देण्यासाठी शेतकरी विक्रेत्यांकडे फिरत आहे. मात्र त्याला युरिया हवा असेल तर इतर विद्राव्य खतांची सक्ती केली जात आहे. केवळ युरिया हवा असेल तर विविध कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे युरियासाठी काही शेतकरी नाईलाजाने हे लिंकिंगची सक्ती केलेले खत किंवा कीडनाशके घेत आहे. 
 
कृषि विभागाला थांगपत्ता नाही ? 
जिल्ह्यात खतांचा काळाबाजार होऊ नये म्हणून कृषि विभागाने भरारी पथके नेमली आहेत. या पथकांतील अधिकारींना किंवा तालुका कृषी अधिकारी यांनी या विक्रेत्यांकडे जात साधी चौकशीही केली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शहादा येथे तर आज शेतकऱ्यांची भलीमोठी रांग लागली होती. लिंकिंगच्या सक्तीवरून शेतकरी आणि विक्रेते यांच्यात वादावादीही झाली. अनेक शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. 
 
पेरणी सुरू आहे, युरियासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे, मात्र तो आम्हाला लिंकिंगमध्ये घ्यावा लागत आहे. त्याशिवाय मिळतच नाही, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लिकिंगचा प्रश्‍न सोडवून आम्हाला युरिया उपलब्ध करून द्यावा. 
- नरोत्तम पाटील, दामळदा (ता.शहादा)