राणीपूर परिसरातील गावांना पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

शहादा : राणीपूर (ता. शहादा) परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यात घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले, झाडे उन्मळून पडली. आंबा, चारोळी, महूचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस; मोठे नुकसान; झाडे उन्मळली; घराचे छत उडाले. 

शहादा (नंदुरबार) : राणीपूर (ता. शहादा) परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यात घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले, झाडे उन्मळून पडली. आंबा, चारोळी, महूचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस; मोठे नुकसान; झाडे उन्मळली; घराचे छत उडाले. 

गेल्या दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता असली, तरी वादळी वारा सुरू असल्याने ते जाणवत नव्हते. मात्र, आज दुपारपासूनच उकाडा जाणवत होता. दरम्यान, आज दुपारी चारच्या सुमारास वादळी वारा सुरू होऊन जोरदार पावसाला सुरवात झाली. वादळी वारा जोरात असल्याने राणीपूर परिसरातील काही गावांमधील रस्त्यालगत असलेली झाडेही उन्मळून पडली. काही ठिकाणी झाडे घराच्या छतांवर पडली. त्यामुळे घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांचे छतच उडून गेले. घराची कौले वाऱ्यामुळे खाली पडून फुटली. राणीपूरसह परिसरातील नागझिरी, कोटबांधणी, साबलापाणी, कर्लापाणी, उम्रापाणी, भुरियुमड, उखळापाणी, अंधारपाडा, पिंप्राणी, जुनी पिंप्राणी आदी गावे व पाडे परिसरात गारांसह वादळी पाऊस झाला. 

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा, चारोळी, महूची मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याचे दिसून आले. यातून ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्या रजनी सुरेश नाईक यांच्यासह पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. सुरेश नाईक यांनी परिसरातील गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीचे पंचनामे त्वरित करून ग्रामस्थांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Villages in Ranipur area were lashed by rains