दुर्गम भागातील वाड्या पाड्यांवर स्वयंसेवकांकडून मिळता आहेत अभ्यासाचे धडे 

कमलेश पटेल
Tuesday, 8 September 2020

शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद होऊ द्यायचे नाही. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेल्या कित्येक दिवसापासून उद्यमशील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक अनेक पाड्यांमध्ये चिमुकल्यांना अभ्यासाचे धडे देत आहेत.

शहादा  : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राखण्यासाठी शाळा बंद असल्याने बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. परंतु जिल्हा वाड्या- पाड्यात, डोंगरदऱ्यांत विखुरला असल्याने काही भागात मोबाईलची साधी रेंजही नाही. तसेच काही पालकांकडे महागडे अँड्रॉइड मोबाइलही नाहीत. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी बामखेडा (ता. शहादा) येथील उद्यमशील बहुउद्देशीय संस्था पुढे आली असून स्वयंसेवकांकडून अनेक पाड्यात शिक्षणाचे वर्ग चालवून अभ्यासाचे धडे देत आहेत. 

शहरी भागात शाळा बंद असल्या तरी विविध माध्यमांच्या साहाय्याने शिक्षण मात्र काही प्रमाणात का असेना सुरू आहे. याउलट ग्रामीण भागात विशेषतः अतिदुर्गम भागात ऑनलाइन शिक्षण हा प्रकार अद्यापही उपाय कारक होताना दिसून येत नाही. शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद होऊ द्यायचे नाही. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेल्या कित्येक दिवसापासून उद्यमशील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक अनेक पाड्यांमध्ये चिमुकल्यांना अभ्यासाचे धडे देत आहेत. त्यात अक्षर ओळख, अंक ओळख, वाचन, लेखनाचे धडे मुलांना देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवास सुरू ठेवला आहे. 

संस्थेच्या या कार्याला स्थानिक ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभत असून या कार्याबद्दल संस्थेचे विशेष कौतुक केले जात आहे. या उपक्रमास संस्थेचे सचिव सुशील गव्हाणे ह्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यरत स्वयंसेवकांचे संस्थेचे अध्यक्ष दीपक वसावे, उपाध्यक्ष रवींद्र गवळे ह्यांनी विशेष आभार मानले. 

गावनिहाय स्वयंसेवक 
अजय पावरा (देवळीपाडा), मिनेश पावरा (रेवनागर), रवींद्र पावरा (घोटाळी पाडा), तुलसीदास पावरा (जोयदा), बादल पटले (कुढावद), नितीश गांगुर्डे (टाकली पाडा), पाडली विक्रम वळवी (पाडली), दीपक वसावे (शोभानगर), सचिन राठोड (बोरी तांडा), तापसिंग पाडवी (शेवगे तांडा, गोरंबा), ठाणसिंग वसावे (मकतर झिरा), चेतन भोसले (सत्तार पाडा) अशा अनेक पाड्यात स्वयंसेवक कार्यरत आहेत. 

सध्या शाळा बंद आहेत. आदिवासी बांधवांकडे ऑनलाइन शिक्षणाच्या पर्याय अनेक कारणांमुळे उपलब्ध नाही. म्हणून ग्रामीण तथा अती दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्थेच्या स्वयंसेवक जे विशेष कष्ट घेत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार. 
-दीपक वसावे, अध्यक्ष, उद्यमशील सेवाभावी संस्था.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Volunteers from an enterprising service organization provide education to students in remote areas