esakal | दहा वर्षांपासून बांधकाम, उद्‌घाटनाची प्रतीक्षा आणि त्यापूर्वीच आरोग्य केंद्राचे आरोग्य बिघडले 

बोलून बातमी शोधा

दहा वर्षांपासून बांधकाम, उद्‌घाटनाची प्रतीक्षा आणि त्यापूर्वीच आरोग्य केंद्राचे आरोग्य बिघडले }

दहा वर्षांपासून उपकेंद्राची इमारत बांधून हस्तांतरित झालेली नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

uttar-maharashtra
दहा वर्षांपासून बांधकाम, उद्‌घाटनाची प्रतीक्षा आणि त्यापूर्वीच आरोग्य केंद्राचे आरोग्य बिघडले 
sakal_logo
By
संजय मिस्‍त्री

 वडाळी ः येथील आरोग्य उपकेंद्राची उद्‌घाटनापूर्वीच दुसऱ्यांदा दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आली. तरीही आरोग्य विभागाला उद्‌घाटनाचा मुहूर्त सापडलेला नाही. कोरोना काळात नागरिकांना आरोग्यसेवा मिळावी, अशी मागणी होत आहे.

वडाळी येथील आरोग्य उपकेंद्राचे दहा लाख रुपये खर्चून दहा वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. अर्धवट काम ठेवून ठेकेदाराने पोबारा केला. ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला. त्यातून या उपकेंद्राची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली. तरीही उपकेंद्रातून आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले. उपकेंद्रसभोवताली काटेरी झुडपे, घाणीचे साम्राज्य झाल्याने डुकरांचा वावर वाढला. यातून रोगराई निर्माण होत असल्याने उपकेंद्राचे उद्‌घाटनापूर्वी आरोग्य बिघडले आहे. यामुळे आरोग्यसेवा देणार तरी कोण, असा प्रश्न उपस्‍थित होत आहे. 

कोरोनाकाळात आरोग्य केंद्रावर भार 
दीड वर्षापासून येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रोजच्या आरोग्यसेवा देण्यासाठी जुनी इमारतीचा वापर होत आहे. इमारत नादुरुस्त असल्याने येथील अधिकारी, कर्मचारी जीव मुठीत धरून आरोग्य सेवा देत आहेत. शिबिर, लसीकरण यांसह अन्य कार्यक्रमाचे आयोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. अपुरे कर्मचारी असल्याने जेमतेम आरोग्य सुविधा मिळत आहे. मात्र, दहा वर्षांपासून उपकेंद्राची इमारत बांधून हस्तांतरित झालेली नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. 

उपकेंद्राबाबत संबंधित ठेकेदाराकडून पूर्णत्वाचा अहवाल आलेला नाही. उपकेंद्राच्या बांधकामात अनेक त्रुटी असून, त्या ठिकाणी आरोग्यसेवा सुरू करणे योग्य नसल्याने ती वापरात येत नाही. 
-डॉ. राजेंद्र वळवी, तालुका आरोग्याधिकारी 

दोन वर्षांपासून मी वैद्यकीय अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. त्याच्यापूर्वी या उपकेंद्राचे बांधकाम झाले आहे. या उपकेंद्राच्‍या वापराचा अहवाल आमच्याकडे प्राप्त नाही. उपकेंद्र परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने आरोग्यसेवा देणे अवघड आहे. 
-डॉ. विजय मोहने, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वडाळी 
 

संपादन- भूषण श्रीखंडे