अरे बापरेः सभेतच आणला मुदत संपलेल्या औषधांचा साठा.. आणि आरोग्य यंत्रणेची केली 'चिरफाड' !  

धनराज माळी
Friday, 17 July 2020

काही आरोग्य उपकेंद्रांमध्ये रुग्णांना औषधांचे वितरण करण्यात येत नाही. ग्रामस्थ लोकप्रतिनिधींकडे नेहमी तक्रार करीत असतात. ग्रामसभेतही औषधांचा वितरणाबाबत नागरिक रोष व्यक्त करतात.

नंदुरबारः प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये मुदतबाह्य औषधे वितरित करण्यात येत असल्याचा आरोप करीत बाहेर फेकून देण्यात आलेल्या औषधांचासाठा जिल्हा परिषद सदस्याने थेट सभागृहात आणल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधितांची कसून चौकशी करण्यात येऊन दोषींना मोकळे सोडणार नाही, अशी ग्वाही देत चौकशीचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिले. आजचा चर्चिल्या गेलेल्या सभेतील गंभीर प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेची 'चिरफाड' झाली. 

नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला राऊत, बांधकाम व अर्थ समिती सभापती अभिजित पाटील उपस्थित होते. सभेत आरोग्य विभागाच्या प्रश्नावर सर्वाधिक चर्चा करण्यात आली. राणीपूर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. सदस्यांना निमंत्रण देण्यात न आल्यामुळे जिल्‍हा परिषद सदस्य भरत गावित यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे निमंत्रण देण्यात येतील, अशी ग्वाही अध्यक्षा सीमा वळवी यांनी दिली. 

अजेंड्यावर सहा विषय 
सभेच्या अजेंड्यावर सहा विषय होते. सुरुवातीला शासनाकडून आलेल्या महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रकांचे वाचन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. त्यानंतर विषय क्र.४ समित्यांच्या कामांचा आढावा होता. यावेळी आरोग्य समितीचा आढावा आरोग्य अधिकारी बोडके सादर करीत असताना जिल्‍हा परिषद सदस्य देवमन पवार यांनी मुदतबाह्य औषधांचा पुरवठा होत असल्याच्या गंभीर प्रकार सभागृहासमोर उपस्थित केला. ते म्हणाले, काही आरोग्य उपकेंद्रांमध्ये रुग्णांना औषधांचे वितरण करण्यात येत नाही. ग्रामस्थ लोकप्रतिनिधींकडे नेहमी तक्रार करीत असतात. ग्रामसभेतही औषधांचा वितरणाबाबत नागरिक रोष व्यक्त करतात. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशीसाठी गेलो असता. केंद्राच्या परिसरात मुदतबाह्य औषधांचासाठा बाहेर फेकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले. तोच मुदतबाह्य औषधांच्या साठ्याचं पोते भरून सदस्य देवमन पवार यांनी सभागृहात सर्वांना दाखवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. 

शहादा तालुक्यातील वाडी पुनर्वसन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा इमारतीत विद्युत जोडणीचे काम अद्याप झालेले नसल्याची नाराजी धनराज पाटील यांनी व्यक्‍त केली. साहाय्यक वित्त अधिकाऱ्यांवर जिल्‍हा प्रशासनाने केलेली निलंबनाची कारवाई अयोग्य असल्याचे मत सदस्या अर्चना गावित यांनी मांडले. त्यावर खुलासा करताना संबंधित विभागाच्या प्रमुखांनी सांगितले की, निलंबित करण्यात आलेला अधिकारी लॉकडाउनच्या काळात सतत गैरहजर होता. त्‍यांचे कामही असमाधानकारक असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले. 

मालेगाव काढ्याचे वाटप 
स्थायी समिती सभेसाठी उपस्थित असलेले माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य भरत माणिकराव गावित यांनी आज अनेक विभाग प्रमुख व कर्मचारी, सदस्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी 'मालेगाव पॅटर्न' काढ्याचे वाटप केले. भरत गावित यांच्या या उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar z. p Brought to the meeting Bags of expired drugs