पंधराव्या वित्‍त आयोगातून कोरोना रूग्णांसाठी ही असणार सुविधा

धनराज माळी
Tuesday, 8 September 2020

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांना स्वॅब देण्यासाठी तसेच स्वॅब पोचविण्यासाठी, कोविड सेंटरमधून उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णांना घरी पोचविण्यासाठी तसेच आवश्यक वैद्यकीय साहित्याची ने-आण साठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेतला होता.

नंदुरबार : कोरोना रग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायतीनी पुढाकार घेऊन रुग्णांच्या वाहतुकीसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांना स्वॅब देण्यासाठी तसेच स्वॅब पोचविण्यासाठी, कोविड सेंटरमधून उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णांना घरी पोचविण्यासाठी तसेच आवश्यक वैद्यकीय साहित्याची ने-आण साठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेतला होता. जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी रुग्णवाहिकेसाठी ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून खर्च करण्यास परवानगी दिली आहे. यात सारंगखेडा, म्हसावद, मंदाणा, रनाळा, खोंडामळी, विसरवाडी, खांडबारा, अक्कलकुवा, खापर, मोलगी, प्रकाशा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 

भाडेतत्‍त्‍वावर वाहन
ही सर्व वाहने भाडे तत्वावर घेण्यात आली आहेत. वाहनांमध्ये आवश्यक ते बदल करुन हे वाहन दोन दिवसात प्रत्यक्ष उपयोगात आणले जाणार आहे. या वाहनातील वाहनचालकांस पीपीई किट त्याचबरोबर आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा केला जाईल. हे वाहन जरी ग्रामपंचायतीच्या खर्चातून लावली जाणार असली तरीही त्यावर गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण राहील. आवश्यकतेनुसार तातडीच्या प्रसंगी या वाहनाचा उपयोग करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत व परिसरातील इतर गावातील बाधित व्यक्तींसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar zilha parishad gram panchayat ambulance available corona positive