कर्जमाफी पुरेशी नाही, सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा: उद्धव ठाकरे

sarkarnama.in
रविवार, 25 जून 2017

'मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र लगेच स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. कारण नाशिक जिल्ह्याला या कर्जमाफीचा फारसा लाभ झालेला नाही. तसाच राज्यातील अनेक शेतकरीही वंचित राहणार आहे असा 'फिडबॅंक' मला मिळतो आहे. तेव्हा याबाबत पुन्हा समिती नेमायला सरकारला भाग पाडीन. शेतकऱ्याविरुद्धचे गुन्हे मागे घेईपर्यंत स्वस्थ बसणार नाही', असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

नाशिक : 'मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र लगेच स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. कारण नाशिक जिल्ह्याला या कर्जमाफीचा फारसा लाभ झालेला नाही. तसाच राज्यातील अनेक शेतकरीही वंचित राहणार आहे असा 'फिडबॅंक' मला मिळतो आहे. तेव्हा याबाबत पुन्हा समिती नेमायला सरकारला भाग पाडीन. शेतकऱ्याविरुद्धचे गुन्हे मागे घेईपर्यंत स्वस्थ बसणार नाही', असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी संप केला. कर्जमाफीचे आंदोलन केले. ते यशस्वी झाले. त्याबाबत त्यांचे आभार मानण्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष ठाकरे यांनी आज नाशिक येथून आपल्या दौऱ्याला प्रारंभ केला. यावेळी ओझर येथे शिवसेनेच्या नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. कर्जमाफीचा निर्णय पुरेसा नाही. त्यात खुप त्रुटी असून राज्यातील असंख्य शेतकरी त्यापासून वंचित राहणार ओहत अशी तक्रार यावेळी शेतकऱ्यानी व कार्यकर्त्यांनी मांडली. त्यानंतर शेतकरी आंदोलनाचे ऐतिहासिक केंद्र असलेल्या पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेत 'नाशिक जिल्ह्याला कर्जमाफीचा फायदा झालेला नाही. त्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत याची मला जाणीव आहे. तरीही केवळ तुमचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहे', असे ठाकरे यांनी सांगितले.

'शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करायची घोषणा केली होती. ती प्रत्यक्षात आली काय? हे पहावे लागेल. अनेक शेतकरी वंचित राहिलेत. त्यांना न्याय कोण देणार? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शिवसेना शेतकऱ्यांच्या आंदोलनात सक्रीय होती . या वेळीही मी स्वतः शेतकऱ्यांबरोबर राहीन. राहिलेल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्‍न सोडणार नाही. याविषयी सरकारला एक समिती नेमायला लावू. त्याद्वारे त्याचा अभ्यास व माहिती संकलन करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले.

ठाकरे यांनी निफाड, नैताळे येथील शेतकऱ्यांचीही भेट गेतली. त्यांच्याशी चर्चा केली. नैताळे येथील 353 शेतकऱ्यांवर शेतकरी आंदोलनादरम्यान दरोड्याचा गुन्हे दाखल केलेला आहे. हा खटला मागे घ्यायला भाग पाडू. त्यासाठी राज्य शासनाशी चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेईन असे त्यांनी सांगितले.

एकंदर या दौऱ्याविषयी शेतकऱ्यांत मात्र संमिश्र चित्र होते. हा दौरा पूर्वनियोजित होता. मात्र शासनाची कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी होता. त्यामुळे याचे श्रेय नेमके कोणाला?. कर्जमाफी कोणाला व किती मिळणार?. असे अनेक प्रश्‍न व गोंधळ शेतकरी तसेच अगदी शिवसेनेच्या आमदारातही होता. या भागात प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, टोमॅटो व भाजीपाला ही पिके आहेत. त्यांना मिळणारे एकरी पीककर्ज लाखाच्या आसपास असते. त्याला मर्यादा लादल्याने निफाड व जिल्ह्याला काहीही लाभ होणार नाही अशी टिका सुरु झाली आहे. त्यामुळे ठाकरेंचे स्वागत झाले. मात्र शेतकऱ्यांतच संमिश्र भावना होत्या.

Web Title: marathi news nashik news udhav thackery shivsena loan waiver