esakal | दिवाळीची गर्दी आणतेय कोरोनाची दुसरी लाट?
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

निष्कळजीपणा म्हणजे धोक्याची घंटा. दिवाळीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी खरेदी किंवा गर्दी ही धोकेदायक ठरू नये. कारण यामुळे कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता देखील नाकारता येत नाही. 

दिवाळीची गर्दी आणतेय कोरोनाची दुसरी लाट?

sakal_logo
By
विनायक सुर्यवंशी

नवापूर (नंदुरबार) : दीपावली पर्व सुरु झाले असले तरी कोरोना अजून तळ ठोकून आहेच, हे विसरता कामा नये. खरेदीसाठी बाजारात तुफान गर्दी, मास्क, फिजिकल डिस्टंसिंगचाही विसर पडल्यासारखे लोकांचा सार्वजनिक ठिकाणी व्यवहार सुरू आहे. हाच निष्कळजीपणा म्हणजे धोक्याची घंटा. दिवाळीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी खरेदी किंवा गर्दी ही धोकेदायक ठरू नये. कारण यामुळे कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता देखील नाकारता येत नाही. 

मार्च महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचा उद्रेक अनुभवण्यास मिळाला आहे. नवापुरमध्ये देखील हिच स्‍थिती होती. परंतु १५ दिवसांपासून कोरोना बाधितांमध्ये घट होऊ लागली आहे. ही समाधानाची बाब असली तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारांमध्ये होणारी तुफान गर्दी सर्व उपाययोजनांवर पाणी फिरविणारी ठरण्याची शक्यता आहे. दाटीवाटीने होणारी खरेदी आणि मास्कचा विसर हे चित्र येणाऱ्या दिवसात धोक्याची घंटा ठरू शकते. लोकांनी निष्काळजीपणा न करता यंदा खरेदीला मुरड घालण्याचे आवाहन तज्ज्ञ मंडळींनी केले आहे. 

दहशतीनंतर समाधान पण..
नवापूर तालुक्यात जुलै महिन्यात सुरुवात झाली. गेली सात ते आठ महिन्यांपासून नागरिक दहशतीत वावरत आहेत. मात्र, शहर-जिल्हा आरोग्य यंत्रणा, पालिका व जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाच्या प्रयत्नांनी आजघडीला कोरोनावर नियंत्रण येत आहे. रोज शंभरीच्या आसपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघत असताना गेल्या १५ दिवसांपासून पन्नासीच्या आत रुग्ण आढळत आहेत. ही समाधानाची बाब असली तरी यामुळे लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. येणाऱ्या काळात हे धोकादायक ठरू शकते. नदुरबार जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या ६ हजार ११४ झाली आहे. यातील ५ हजार ७०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात एकूण मृत्यूचा आकडा १५९ आहे. सद्या अडीचशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २४ हजार ५४१ लोकांचे स्वॅब घेतले आहेत. 

रूग्णांमध्ये घट
अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्टद्वारे बाधितांची शोधाशोध सुरुच आहे. गेली आठ महिन्यांपासून नुकसान झेलणाऱ्या व्यापारी, दुकानदारांना दिवाळी 'पिरियड' वाया जाऊ देण्याची इच्छा नाही. परंतु मिशन बिगिनच्या अनलॉक अंतर्गत बस आणि रेल्वे सुरु झाल्याने प्रवाशांची मोठी ये-जा सुरु झाली आहे. दिवाळीनिमित्त यात वाढच होत आहे. पूर्ण क्षमतेने सुरु झालेली ही वाहतूक कितपत 'सेफ' आहे येणाऱ्या काळात कळेलच. 
 
संपादन ः राजेश सोनवणे