soybin
soybin

भात, सोयाबीन व कापूसच्या क्षेत्रात वाढ... मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा !

 नवापूर  : दर वर्षांप्रमाणे यंदाही भात, कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, तूर व ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. तालुक्यातील साठ हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. पेरणी झाली, पाऊस नाही, त्यात खतांची महाटंचाई,  खतासाठी शेतकरी दारोदार हिंडत आहे. सर्व विदारक चित्र निर्माण झाले आहे. जुलै अर्धा होत आला तरी दमदार पाऊस पडत नसल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय या चिंतेत शेतकरी आहे.


तालुक्यातील शेतकऱ्यांनी संचारबंदीच्या शेतीची मशागत करून ठेवल्या होत्या.  मान्सूनपूर्व सर्व काम वेळेवर आटोपली होती. यंदा शंभर टक्के मान्सून असल्याने शेतकरी पुर्व तयारीत होता. कोरोनामुळे शहरातील उद्योग व्यवसाय बंद असल्याने शहरात रोजगारनिमित्त गेलेले सर्व आपल्या गावी स्थिरावल्याने यावर्षी शेती कामासाठी मजुरांची टंचाई जाणवली नाही. दर वर्षांप्रमाणे यंदाही भात, कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, तूर व ऊस लागवडी क्षेत्रात वाढ झाली. तालुक्यातील साठ हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे.  तालुक्यात शेतीपयोगी जमीन व  वातावरण आहे. नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी व खांडबारा या चार विभागात तालुक्याची विभागणी केली आहे. दरवर्षी मजुरांअभावी शेती कामांना माणसं मिळणे दुरापास्त होत असे. मात्र यावर्षी कोरोनामुळे ती कमतरता भासली नाही. नवापूर तालुक्यात बहुतांश लोकांची कमीअधिक प्रमाणात शेती आहे. त्यामुळे ही शेतमजूर लवकर मिळत नाही. याला पर्याय म्हणून एकमेकांच्या शेतात काम करून आपली गरज भागवीली जाते. 
बागायती क्षेत्रात ठिबकसिंचनात वाढ झाली आहे. ठिकठिकाणी जलसंधारण काम झाली आहेत. गाळ काढल्याने भूजल पातळी चांगली आहे. तालुक्यात जवळपास पेरणीचे काम पूर्ण झाले आहे. बागायती क्षेत्र सोडले तर कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना सध्या मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे.


नवापूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रापैकी यावर्षी देखील ५९९१६  हेक्टरवरपेरणीचे उद्दिष्ट होते. मागील वर्षीच्या खरीप हंगामात देखिल  शेतकऱ्यांनी भात, कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, ऊस या पिकांना पसंती दिली होती. यावर्षी सरासरी झालेली पेरणी अशी,  भाताची लागवड १६०५९ हेक्टर, कापूस ९७३५ हेक्टर, सोयाबीन ८३६८ हेक्टर, मका ६६६४ हेक्टर, ज्वारी ५५१४, ऊस ४३४३ हेक्टर, तूर ३७७४ हेक्टर, मूग १७६४ हेक्टर, उडीद २३१२ हेक्टर, भुईमूग ७४५ हेक्टर, तीळ २९ हेक्टर, बाजरी ६ हेक्टर, नागली ५ हेक्टर व इतर भाजीपाला असे ८०० हेक्टर असा पीक पेरणी व लागवडीसाठीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मुंग, तीळ व इतर तृण व कडधान्यांच्या पेरणीचे प्रमाण घरी लागेल एवढेच असते. गतवर्षी बोन्डअळीने शेतकऱ्यांचे अर्थचक्रच बिघडविले होते, तरी शेतकरी आशावादी असल्याने या वर्षी पुन्हा कापूस पिकाला पसंती दिली आहे. 


तालुक्याचे पर्जन्यमान सरासरी असते.  सिंचनाच्या सुविधा व  पडणाऱ्या पावसावर पिकांचे उत्पादन अवलंबुन असते. जून पासून पावसाची प्रतीक्षा आहे, जुलै अर्धा झाला, तरी अपेक्षित प्रमाणात पाऊस पडत नसल्याने शेतकरी सह सर्व सामान्य व्यक्ती चिंतेत आहे. रोज पावसाळी वातावरण तयार होते, ढग दाटुन येतात दोन-चार सरी पण बरसातात. जोरदार पाऊस काही पडत नाही, जणू काही त्याने नवापूर तालुक्याला हुलकावणी देण्याचा खेळ सुरू केला आहे. या खेळात मात्र शेतकरी राजाचा जीव दावणीला टांगला जात आहे. आतातरी मान्सूनने दमदार एन्ट्री करून दुबार पेरणीपासून वाचवावे अशी देवाकडे शेतकरी वर्ग प्रार्थना करीत आहे. प्रशानाने पुरेशा प्रमाणात खतांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. युरिया खतासाठी शेतकरी रोज बाजारपेठच्या गावांच्या फेऱ्या मारतो आहे. अधिक दाम देऊन ही खंत मिळत नाही, ही शोकांतिका आहे. चहुबाजूंनी शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे, जगाचा पोशिंदा आज निसर्ग चक्र आणि मानवनिर्मित दृष्टचक्रात अडकून पडला आहे.

 संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com