esakal | नवरात्रोत्‍सवाचे वेध; मूर्तीची उंची ठेवायची किती? 
sakal

बोलून बातमी शोधा

navratrotsav

नवरात्रोत्सवातही दुर्गामातेच्या मूर्तीच्या उंचीबाबत प्रशासनाचे अजूनही आदेश न आल्याने मूर्तिकारांमध्ये संभ्रम आहे. येत्या १७ ऑक्टोबरपासून या उत्सवाला सुरुवात होणार असून आता केवळ तीन आठवडे उरले आहेत.

नवरात्रोत्‍सवाचे वेध; मूर्तीची उंची ठेवायची किती? 

sakal_logo
By
विनोद सुर्यवंशी

नवापूर (नंदुरबार) : नवरात्रोत्सव अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपला आहे. अद्याप नवरात्रोत्सवानिमित्त प्रशासनाने कुठल्याही प्रकारची नियमावली अथवा परिपत्रक काढलेले नाही. गणेशोत्सव प्रमाणे दुर्गामातेच्या मूर्तीची उंची किती असावी, उत्सव कसा साजरा करावा याबाबत मूर्तिकारांमध्ये संभ्रम आहे. अवघे तीन आठवडे उत्सव असताना कोणताही निर्णय नाही. नागरिकांना व मूर्तिकारांना प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. 
यावर्षी जगावर कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने अशा परिस्थितीत सर्वत्र धूमधडाक्यात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवावर सुध्दा अनेक बंधने राहणार किंवा नाही याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवातही दुर्गामातेच्या मूर्तीच्या उंचीबाबत प्रशासनाचे अजूनही आदेश न आल्याने मूर्तिकारांमध्ये संभ्रम आहे. येत्या १७ ऑक्टोबरपासून या उत्सवाला सुरुवात होणार असून आता केवळ तीन आठवडे उरले आहेत. मूर्तीच्या उंचीबाबत आदेश नाही. मूर्तीची उंची ठेवायची तरी किती असा प्रश्न मूर्तिकारांना पडला आहे. यामुळे मूर्तिकारांना अजूनही ऑर्डर मिळाल्या नसल्याची माहिती आहे. 

गुजरातची सिमेच्या भागामुळे धुमधडाका
नवापूर तालुका हा गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने गुजराती परंपरेचा अधिक प्रभाव आहे. शहरात धूमधडाक्यात नवरात्रोत्सव साजरा होतो. नवरात्रोत्सवात देवीची मूर्ती सहा ते आठ तर कोठे बारा फूट उंच मूर्तीची स्थापना केल्या जाते. उत्सवाच्या सहा महिन्याअगोदरपासूनच मूर्तिकार मूर्ती निर्मितीच्या कामाला गुंतलेले असतात. मात्र यावर्षी देशासह राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सरकार व प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालून अनेक नियम घालून दिले आहेत. यामुळे सण, उत्सव अत्यंत शांततेत साजरे केले जात आहेत. 

एक महिना उशिराने उत्‍सव तरीही..
प्रशासनाने यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना मूर्तीची उंची चार फुटापेक्षा जास्त नासावी असे आदेश दिले होते. यामुळे अनेक मूर्तिकारांचे नुकसान झाले. दरम्यान आता वीस दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. प्रशासनाने मूर्तीच्या उंचीबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने सर्वच कामे अडकून पडली आहेत. याशिवाय गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. या संदर्भात सर्वांना प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. यावर्षी अधिक महिना असल्याने नवरात्रोत्सव एक महिना उशिरा येत आहे. 

नवरात्रोत्‍सवासाठी या वर्षी अद्याप एक ही ऑर्डर बुक झालेली नाही. गणेशोत्सवाचे शासनाचे नियम लक्षात घेता दोन ते चार फुटाच्या देवीच्या मुर्त्या तयार करत आहे. नवरात्रोत्सव वीस दिवसांवर येऊन ठेपला मात्र मूर्ती घेण्यासाठी कोणीही आलेले नाही, अस पहिल्यांदा होत आहे. कोरोनामुळे सर्व व्यवसाय मातीमोल झाला आहे. 
- बापू दुसाणे, मूर्तिकार, नवापूर 

संपादन ः राजेश सोनवणे