गुराख्याला तरंगणारा मृतदेह दिसला; धावतच सुटला

विनोद सुर्यवंशी
Tuesday, 29 September 2020

शहरातील दहा मुले २७ सप्टेंबरला चरणमाळ- बोरझर (ता. नवापूर) जवळील जंगलातील काका काकी धबधब्यावर अंघोळीला गेले होते. मात्र धबधबा परिसरातून युवक बेपत्ता झाला होता.

नवापूर (नंदुरबार) : चाळीस तासापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृत देह अखेर आज सकाळी काका-काकी धबधब्यावर तरंगताना गुराख्याला दिसून आला. मोहम्मद अब्दुल खालिक घरिया या २१ वर्षीय युवकाचा आज मृतदेह आढळून आल्याने घरीया कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

शहरातील दहा मुले २७ सप्टेंबरला चरणमाळ- बोरझर (ता. नवापूर) जवळील जंगलातील काका काकी धबधब्यावर अंघोळीला गेले होते. मात्र धबधबा परिसरातून युवक बेपत्ता झाला होता. सदर धबधबा हा डांग (गुजरात राज्यात) हद्दीत येत असून ही घटना २७ सप्टेंबरच्या सायंकाळी सहा वाजता घडली होती. आपल्या पैकी एक जण दिसत नाही हे जेव्हा भावंडांना लक्षात आले; तेव्हापासून शोधाशोध सुरू होती. 

सकाळपासून चार टिम शोधकार्यात
नवापूर शहरातील दहा युवक चरणमाळ बोरझर जवळील जंगलातील काका काकी धबधब्यावर अंघोळ करण्यासाठी गेले होते. साधारण तासभरात अंधोळ केल्यानंतर त्यातील एक युवक मोहम्मद अब्दुल खालिक घरिया (वय २१, राहणार शिवाजी रोड, नवापूर) हा युवक लघुशंका करून येतो असे सांगून धबधब्या बाहेर पडला. मात्र परत आला नाही, त्याच्या भावंडांनी पार्किंग केलेल्या वाहनांजवळ येऊन पाहिले असता त्या ठिकाणी मोहम्मद दिसला नाही. रात्रभर शोध घेतला परंतु अंधार असल्याने अडचणी येत होत्या. सकाळी युवकाला शोधण्यासाठी जंगलात चार टिम रवाना झाल्यात होत्या. चिंचपाडा, विसरवाडी व नवापूर शहरातील व आजूबाजूचा गावातील ग्रामस्थांनी युवकाचा दिवसभर तपास केला.

गुरांना पाणी पाजण्यासाठी नेले अन्‌
सकाळी गुराखी धबधब्याकडे गुरांना घेऊन गेला त्यावेळेस धबधब्याच्या पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसला आणि मोहम्मदची  शोध मोहीम थांबली. मोहम्मद याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मोहम्मद अब्दुल खालिक घरिया हा युवक लाईट बाजारातील घरिया किराणा दुकानदाराचा मुलगा होता. आज मुलाचा मृतदेह मिळून आल्यानंतर कुटुंबाच्या सर्व आशा संपल्या. घरीया कुटुंबावर शोककळा पसरली.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur waterfall deadbody waching the cowherd