सरकारच्या 2017 मधील थकबाकीदारांना लाभ देण्याच्या धोरणाने बॅंक सुस्थितीच्या वाटेवर: केदा आहेर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

 नाशिक : राज्य सरकारने कर्जमाफी योजनेतून 2016-17 च्या थकबाकीदारांना लाभ देण्याचे धोरण स्वीकारले. त्याचा फायदा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस होणार असून, बॅंक सुस्थितीत येईल, असा विश्‍वास बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी व्यक्त केला.

 नाशिक : राज्य सरकारने कर्जमाफी योजनेतून 2016-17 च्या थकबाकीदारांना लाभ देण्याचे धोरण स्वीकारले. त्याचा फायदा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस होणार असून, बॅंक सुस्थितीत येईल, असा विश्‍वास बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी व्यक्त केला.

सरकारच्या धोरणातून बॅंकेला बाराशे कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही त्यांनी सांगितले. "कॉफी विथ सकाळ' उपक्रमांतर्गत त्यांनी "सकाळ'च्या संपादकीय विभागाच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला... 

नोटाबंदी, कर्जमाफीचे धोरण अशा परिस्थितीत शेतकरी दोलायमान झाले. त्यातून बॅंकेच्या वसुलीवर परिणाम झाला. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या अर्थवाहिनीची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत आणण्याखेरीज पर्याय नाही. कर्जवसुली ही त्यासाठी महत्त्वाची बाब आहे, असे सुरवातीलाच सांगून श्री. आहेर म्हणाले, की सामान्य माणसांच्या ठेवीच्या रकमेतून कर्जवाटप केले आहे. आता ठेव ठेवलेल्या माणसांना कुटुंबातील लग्न, दवाखान्यासाठी पैसे हवेत म्हटल्यावर वसुली करून ते परत करावेच लागतील. पूर्वी आर्थिक व्यवहार सुरू असल्याने त्यातून गंगाजळी तयार व्हायची. त्यामुळे वसुलीची गरज भासली नव्हती. आता मात्र गंगाजळीअभावी वसुली करावी लागत आहे.

रोज पाच ते सहा कोटींची वसुली होते. दोन हजार 300 कोटी थकबाकीपैकी 673 कोटींची वसुली झाली आहे. कर्जमाफी योजनेतून पाचशे कोटी बॅंकेला मिळाले आहेत. मध्यंतरी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी 2016-17 च्या थकबाकीदारांच्या संबंधाने निर्णय घेणे ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे, यावर चर्चा झाली. सरकारही त्याबाबतीत सकारात्मक विचार करीत आहे. 
 
ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित, काळजी नको 
ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. त्यामुळे त्याबद्दल काळजी करण्याचे कारण नाही. सिल्व्हासामध्ये झालेल्या पतसंस्थेच्या कार्यक्रमात जाऊन ही बाब मी स्वतः स्पष्ट केली. त्यामुळे पतसंस्थांनी ठेवी नव्याने गुंतविण्यास सुरवात केली आहे, असे सांगून सामान्यांमध्ये बॅंकेबद्दल तयार झालेल्या अविश्‍वासाबद्दलची माहिती श्री. आहेर यांनी दिली. ते म्हणाले, की कर्ज मागायला जात नाही तोपर्यंत परतफेड करायची नाही, अशी काहीशी भावना तयार झाली आहे. तसेच सरकारकडून माफी होते म्हटल्यावर परतफेड करायची कशाला, याचाही वसुलीवर परिणाम झाला आहे. आता वसुलीच्या स्वीकारण्यात आलेल्या धोरणाला शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी मदत करावी, अशी माझी व्यक्तिशः सर्वांना विनंती आहे. कर्जवसुलीमधून कुणालाही सोडणार नाही. बॅंकेचे कामकाज बॅंकिंग पद्धतीने चालावे यावर भर देत आहे. त्यामुळे संचालक मंडळानेही सहकार्याची भूमिका घेतली आहे. 

परतफेड करणाऱ्यांना कर्ज 
ते म्हणाले, की शेतकऱ्यांनी या महिनाअखेरपर्यंत कर्जाची परतफेड करताच त्यांना आगामी खरीप हंगामासाठी कर्ज बॅंकेतर्फे दिले जाईल. सात-बारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा असल्याने परतफेड करणे अपरिहार्य आहे. परतफेड केल्यावर इतर बॅंकांकडून अर्थसहाय्य मिळविण्याचा पर्याय शेतकऱ्यांपुढे तयार होतो. यापूर्वी कर्ज द्यायला सांगितले गेले आणि प्रशासनाने वसुलीला सुरवात करताच त्यांना थांबविण्यात आले. आता मात्र प्रशासनाला वसुलीसाठी "फ्री हॅंड' दिला आहे. वसुलीमध्ये अडचण असणाऱ्या शेतकऱ्यांशी मी स्वतः बोलत आहे. हे कमी काय म्हणून मी बॅंक अध्यक्षांचे वाहन विक्रीचा निर्णय घेतला. तोट्यातील चार शाखाही बंद केल्या. सरकारी दरापेक्षा अधिक भाडे देण्यात येते काय, याची माहिती मागविली आहे.

निफाड साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून "ड्रायपोर्ट' उभारणीतून बॅंक आणि कारखान्याला "बूस्ट' मिळेल. एकरकमी परतफेडीचा प्रस्ताव बॅंकेला प्राप्त झाला आहे. तो सरकारकडे पाठविला जाणार आहे. नाशिक साखर कारखाना चालविण्यास देण्यासाठी तिसऱ्यांदा निविदा काढण्यात येत आहे. या कारखान्याला अर्थसहाय्य करण्यासाठी अर्थसंस्था तयार झाल्याची माहिती नुकतीच मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी प्रास्ताविक केले. 

चौकट 
सोयरीक जुळवताय, मग हे तपासून पाहाच..! 
बंगला, गाडी आहे म्हटल्यावर अशा कुटुंबात मुलगी देण्यासाठी एक शेतकरी गेले होते. त्या वेळी शेजाऱ्यांनी मध्यंतरी जिल्हा बॅंकेचे कर्मचारी वसुलीला येऊन गेले, सोयरीक करताना तपासून पाहा, असा सल्ला मुलीच्या पित्याला दिला. बॅंकेच्या वसुलीसाठी कर्मचारी घरी जाऊ लागल्याने गृहिणींकडून पती, मुलांवर डोईवरचा बोजा फेडण्याचा दबाव वाढला आहे. त्याच वेळी प्रत्यक्ष वसुलीतून बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना झालेल्या चुका समजू लागल्या. हे सर्व पाहता वाईटातून चांगले घडेल, असा विश्‍वास मला व्यक्तिशः वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. 
----- 
चौकट दोन 
37 कोटींनी तोटा कमी... 
0 बॅंकेच्या शाखा - 213 (स्वमालकीच्या जागा - 27, बखळ जागा - 4) 
0 तोट्यातील शाखा - 63, नफ्यातील शाखा - 150, सोनेतारण शाखा - 40 
0 एकूण खातेदार - 14 लाख, व्यवहार सुरू असलेली खाती - 8 लाख 
0 कर्जदार शेतकरी सभासद - 3 लाख 17 हजार 343 
0 थकीत सभासद - 2 लाख 22 हजार 281 
0 एकूण वसुली - 673 कोटी 57 लाख (कर्जमाफी वजा जाता - 245 कोटी) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nddc bank chairman keda aaher