esakal | दरीआईमाता पर्यटनस्थळ हीच दरी गावाची ओळख
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

दरीआईमाता पर्यटनस्थळ हीच दरी गावाची ओळख

sakal_logo
By
आनंद बोरा,सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः नाशिक शहरापासून 16 किलोमीटर अंतरावरील दरी गाव. आदिवासी बहुल गाव पेसाअंतर्गत समाविष्ट असून, गावाची लोकसंख्या दोन हजारांपर्यंत आहे. 

उत्तरेला आळंदी नदी वाहत असून, इथे धरण आहे. गावाच्या पूर्वेला डोंगराच्या कुशीत दरीआईमाता मंदिर आहे. हिरवाईने नटलेल्या परिसरात भाविकांची गर्दी वाढत असून, इथले धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. तीर्थक्षेत्राची मोहोर सरकारने उमटविल्यास इथल्या विकासाला हातभार लागणार आहे. 
     गाव सौरऊर्जेवर स्वयंपूर्ण करण्याचा मानस सरपंच अलका गांगोडे यांचा आहे. ग्रामपंचायतीच्या विहिरीतून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. गावात औषधी वनस्पतींचे उद्यान असून, तीस जातींच्या वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. कुपोषणमुक्त गाव असून, गावाला निर्मलग्राम, पर्यावरण विकास, संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान, यशवंत पंचायत, पंचायत सबलीकरण आदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हरियाली पाणलोट योजना प्रकल्प गावाने पूर्ण केला आहे. सांडपाणी व्यवस्थापन व सार्वजनिक कामात लोकांचा सहभाग मोठा असतो. पंचवीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. 

 
डिजिटल शाळा, अंगणवाडी 
गावातील अंगणवाडी आणि शाळा डिजिटल आहे. गावात मारुती मंदिर आहे. चैत्रपौर्णिमेला दरीआईमातेचा यात्रोत्सव होतो. त्यावेळी बोहाडा होतो. तो पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित असतात. गावातील प्रत्येक घरातून देव नाचविण्यासाठी विविध देवांचे मुखवटे घातले जातात. बोहाड्याची सुरवात (कै.) आनंदराव पिंगळे यांनी केली. नथू घोटे हे गावचे कीर्तनकार. पूर्वी हे गाव गावठाणामध्ये होते. मानमोडीची मोठी लागण झाल्याने पूर्ण गाव विस्थापित झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. होळी हा पारंपरिक उत्सव साजरा होतो. गावाला 226 हेक्‍टर डोंगररांगेची देणगी मिळाली असून, त्यातील दहा हेक्‍टर जमीन वन विभागाला तीन वर्षांसाठी वृक्षलागवडीसाठी देण्यात आली आहे. 
 

गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. लोकसहभाग हे विकासाचे गमक आहे. तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. 
- गजराबाई लहानगे (माजी सरपंच) 

शेती हा मूळ व्यवसाय. गावात आदिवासीबांधव मोठ्या संख्येने राहातात. त्यांना औषधी वनस्पतींची माहिती आहे. कोणकोणत्या वनस्पती या भागात आढळतात, याची सूची करण्याचे काम आम्ही भविष्यात करणार आहोत. 
- भारत पिंगळे (ग्रामस्थ) 

loading image
go to top