नदीवर पुलच नाही, म्हणून ग्रामस्थांना वाहने न्यावी लागतात उचलून 

सम्राट महाजन
Monday, 28 September 2020

तालुक्याच्या ठिकाणी जाणे क्रमप्राप्त असेल तर या भागातील नागरिकांना जीव धोक्यात घालून अक्षरशः दुचाकीला उचलून वाहती नदी ओलांडावी लागते.

तळोदा ः तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिक विशेषतः पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड देत जीवन जगतात. बोरवान, टाकळी, हातबारी, रावलापाणी व आसपासच्या भागातील ग्रामस्थांना पावसाळ्यात अनेक वर्षांपासून भलत्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या भागातील ग्रामस्थांना दुचाकीला पुलाअभावी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहत्या नदीतून अक्षरशः उचलून नदी ओलांडावी लागत आहे. त्यामुळे खर्डी- बोरवानदरम्यान असलेल्या नदीवर पूल बांधावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे. 

दळणवळणासाठी चांगल्या दर्जाचे रस्ते नसणे व रस्ते असले तर रस्त्यादरम्यान लागणाऱ्या नदी-नाल्यांवर पूल नसणे, ही या भागातील नागरिकांची सर्वांत मोठी समस्या आहे. अशीच समस्या बोरवान, टाकळी, हातबारी, रावलापाणी, धरमपुरी, पोडलचापाडा, घोडमाग, विहिरीमाळ, बेडवाई, केलीपाणी, अक्राणी, सेदवाईपाडा आदी गावांतील नागरिकांची आहे. एरवी या भागातील नागरिक खाच-खळग्यांचा, नदी-नाल्यांच्या, झाडे- झुडपांच्या कच्च्या रस्त्यावरून सर्व अडचणींवर मात करीत पायी अथवा दुचाकीवरून आपल्या ईप्सितस्थळी पोचतात. मात्र, दर वर्षी पावसाळ्यात या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होतात. 

या भागातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या कामांसाठी बऱ्याचदा तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. मात्र, खर्डी ते बोरवानदरम्यान नदी लागते. ती नदी प्रत्येक वर्षी पावसाळ्यात प्रवाहित होते. नदीवर पूल नसल्यामुळे या भागातील नागरिकांचा तालुक्याशी कधी १५ दिवस, तर कधी एक-एक महिना संपर्क तुटतो. मात्र, कधी अत्यावश्यक अथवा आरोग्याचे काम असेल आणि तालुक्याच्या ठिकाणी जाणे क्रमप्राप्त असेल तर या भागातील नागरिकांना जीव धोक्यात घालून अक्षरशः दुचाकीला उचलून वाहती नदी ओलांडावी लागते. त्यामुळे प्रशासनाने या नदीवर पूल बांधवा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. 

निझरी नदीवर पण हीच समस्या 
धनपूर ते सावरपाडादरम्यान असलेल्या निझरी नदीवरही पूल नसल्यामुळे या भागातील, तसेच जवळच्या भागातील नागरिकांना पावसाळ्यात निझरी नदी ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे निझरी नदीवर पूल व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांची आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीकडेदेखील लक्ष देण्याची गरज आहे. 

एरवी या भागातील ग्रामस्थ कसेबसे नदीतून मार्ग काढतात. मात्र, पावसाळ्यात नदी प्रवाहित झाल्यावर नागरिकांना मोठ्या मुश्किलीला सामोरे जावे लागते. नागरिकांना एका ठिकाणावरून दुसरीकडे जाणे अवघड होते. तालुक्याशी बऱ्याचदा १०-१५ दिवस संपर्क तुटतो. इमर्जन्सीच्या वेळी अक्षरशः दुचाकीला उचलून नदी ओलांडावी लागते. 
-संजय वसावे, ग्रामपंचायत सदस्य, सावरपाडा 

सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिक आजही प्राथमिक सुविधांपासून दूर आहेत. या भागात एकतर रस्तेच नाहीत आणि रस्ते असतील तर त्यादरम्यान येणाऱ्या नदी, नाल्यांवर पूल नाहीत. पावसाळ्यात नदी, नाल्यांत पाणी भरल्यावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात तर कधी एक-दीड महिना तळोद्याशी संपर्क होत नाही. 
-रतिलाल पावरा, ग्रामस्थ, रावलापाणी  नेर

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news no bridge on the river, the villagers have to pick up vehicles