पांढरे सोने विक्रीसाठी बळीराजा होतोय पिवळा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

शेतकऱ्यांनी कापूस मोजणीसाठी नोंदणी करुनही अद्याप बऱ्याच शेतकऱ्याच्या घरात कापूस पडलेला आहे. त्यामुळे तो कधी विकला जाईल? या विवंचनेने बळीराजाही पिवळा होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

पाचोरा : पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व बळीराजाकडून नगदी पीक म्हणून प्रथम पसंती असलेल्या कापसाची विक्री करण्यासाठी बळीराजाची सध्या जीवघेणी कसरत होत आहे. अशातच तालुक्यात एकच कापूस खरेदी केंद्र असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. शेतकऱ्यांनी कापूस मोजणीसाठी नोंदणी करुनही अद्याप बऱ्याच शेतकऱ्याच्या घरात कापूस पडलेला आहे. त्यामुळे तो कधी विकला जाईल? या विवंचनेने बळीराजाही पिवळा होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. 
पाचोरा तालुक्यात एकूण खरीप पेऱ्याच्या सुमारे ७० टक्के पेरा कापसाचा केला जातो. चार- पाच वर्षांपासून कापसाला पर्याय म्हणून मक्याचे उत्पादन शेतकरी घेत असले तरी कापूस उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, या पांढऱ्या सोन्याला अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाही. कापसाच्या मे लागवडीची वेळ आली तरी देखील मागचा कापूस अजून विकला गेलेला नाही. त्यामुळे यावर्षीचा नवा कापूस घरात येईपर्यंत जुना कापूस विकला जातो की नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न बळीराजा करत आहे. पाचोरा तालुक्यात गेल्या खरीप हंगामात सुमारे ३६ हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती. अनेक अडचणींवर मात करून शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पन्न घेतले. अशातच दोन महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गाची भिती वाढली आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. एकीकडे खरिपाच्या तयारीला कमालीचा वेग आलेला असताना शेतकऱ्याला कापूस विकण्याची चिंता कमालीची सतावत आहे. 

कापूस मोजणीला विलंब 
कृषी उत्पन्न बाजार समितीतून नोंदणी करून टोकन घेऊन मिळालेल्या तारखेला व वेळेला ‘सीसीआय’च्या एकमेव खरेदी केंद्रात कापूस आणावा लागत आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने गिरड रस्त्यावरील गजानन जिनिंग हे एकमेव कापूस खरेदी केंद्रात शेतकरी व वाहनचालकांची गर्दी होऊ नये म्हणून दररोज केवळ २० गाड्यांमधून सुमारे ८०० क्विंटल कापसाची खरेदी केली जात आहे. सध्या केवळ २० गाड्यांना प्रवेश दिला जात असल्याने शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. या कापूस केंद्रात ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० रुपये क्विंटल भाव दिला जात आहे. कापूस खरेदीसाठी येणाऱ्या शेतकरी व बैलगाडी अथवा वाहनाचा चालक अशा दोघांनाच या खरेदी केंद्रात प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रसंगी तोंडावर मास्क असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाची सॅनिटायझर कक्षातून बाहेर पडल्यानंतर स्क्रीनिंग केली जाते. त्यामुळे कापूस मोजणीला काहीसा विलंब होत आहे. 

ज्यादा खरेदी केंद्रांची मागणी 
शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेला कापूस त्वरित विक्री व्हावा, यासाठी ज्यादा खरेदी केंद्राची मागणी कापूस उत्पादकांकडून केली जात आहे. त्यानुषंगाने आमदार किशोर पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन हा विषय मार्गी लावण्याचा पाठपुरावा सुरू केला आहे. दुसरीकडे भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी देखील ज्यादा खरेदी केंद्र सुरू करावीत या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकारी व जिनिंग मालकांची एक बैठक झाली होती. अद्यापपर्यंत जास्तीचे कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट तशीच सुरू आहे. 

‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र सुरू केले असले तरी जिनिंग मालक म्हणून मनात मोठी भीती आहे. कारण कापूस ही राष्ट्रीय संपत्ती मानून त्याचे नुकसान झाल्यास अथवा घट आल्यास त्याला जिनिंग मालक जबाबदार राहील व त्यांच्याकडून भरपाई केली जाईल अशा अटी केंद्र सरकारच्या असल्याने जिनिंग मालक खरेदी केंद्र सुरू करण्यास धजावत नाहीत. मात्र, शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून हे खरेदी केंद्र मोठ्या हिमतीने आम्ही चालवत आहोत. 
- प्रमोद सोनार, संचालक, गजानन जिनिंग, पाचोरा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora cotton white gold farmer jeaning no sale