त्या निष्पाप दोन्ही चिमुकल्यांना नडले दारिद्रय...तरीही आई म्हणते माझा पती असा नाही हो... 

प्रा. सी. एन. चौधरी
गुरुवार, 23 एप्रिल 2020

घरातील दारिद्र्य व भकास मनोवृत्तीमुळे विकास ढाकरे हा जन्मदाता आपल्याच चिमुरड्या मुलींच्या जिवावर उठल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्या दोन्ही चिमुकल्या मुलींना दारिद्रय नडले असून, दोन्ही मुलींच्या मृत्यूनंतरही आई मात्र माझा पती असे करणार नाही...हे घडलेच कसे? असं म्हणत फिर्याद देण्यास देखील आली नाही. 

पाचोरा (जळगाव)  : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील जन्मदात्या बापाने दोन गोंडस चिमुरड्या मुलींना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरला असून समाजमन सुन्न झाले आहे. केवळ घरातील दारिद्र्य व भकास मनोवृत्तीमुळे विकास ढाकरे हा जन्मदाता आपल्याच चिमुरड्या मुलींच्या जिवावर उठल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्या दोन्ही चिमुकल्या मुलींना दारिद्रय नडले असून, दोन्ही मुलींच्या मृत्यूनंतरही आई मात्र माझा पती असे करणार नाही...हे घडलेच कसे? असं म्हणत फिर्याद देण्यास देखील आली नाही. 

क्‍लिक करा - खायला नाही..प्यायला नाही जन्मदात्याला चिंता...शेवटी मुलींचा केला खून ! 
 
पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील विकास ढाकरे (तेली) हा गावातच मिळेल ती शेतमजुरीची कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याचे आईवडील गावातच वास्तव्यास असून विकास आपल्या पत्नी व मुलींसह काही दिवसांपासून वेगळा राहत होता. पत्नी व स्वतः मिळेल ते काम करून तो फाटक्या संसाराला ठिगळ लावण्याचा सातत्याने प्रयत्न करीत होता. 

तरीही ती पतीच्या बाजूने 
दारिद्र्यावर मात करण्याच्या त्याच्या या प्रयत्नामुळे तो मानसिकदृष्ट्या खचत गेला व अखेर आपल्याच गोंडस मुलींच्या जिवावर उठला. विकास ढाकरे याला पोलिसांनी अटक केली असली तरी त्याची पत्नी आरती ही दोन मुली गेल्या तरी पाहिजे तेवढी खचलेली दिसली नाही. ‘माझा नवरा असे करणार नाही, हे झाले कसे?’ अशी सारवासारव तिच्याकडून केली जात आहे. फिर्याद देण्यासाठीही ती धजावली नाही. त्यामुळे यंत्रणेला तपासाची योग्य ती दिशा मिळण्यास अडचणी येत आहे. 

स्वतःशीच गुणगणत रहायचा 
नोकरी नाही, योग्य कामे मिळत नाहीत, कामे केली तरी पुरेसा पैसा मिळत नाही आणि गेल्या सव्वा महिन्यापासून ‘लॉकडाऊन’मुळे कामे नाहीत, त्यात पुन्हा पत्नी आरती गरोदर आहे. घरात पत्नी आरती तसेच तनुश्री, पायल, शिवण्या उर्फ परी या तीन मुली. त्यामुळे पाच जणांचा उदरनिर्वाह एकट्याच्या मोलमजुरीवर करून विकास अक्षरशः वैतागलेला होता. गावातून फिरताना देखील तो स्वतःशीच काही तरी गुणगुणत असल्याचे काहींनी सांगितले. 

कबुतर दाखवतो म्हणून सांगितले मुलींना 
त्याने काल (२२ एप्रिल) सकाळी सातच्या सुमारास ‘मी मुलींच्या पोषण आहाराचे तांदूळ घेऊन येतो’ असे सांगत तनुश्री व शिवण्या या दोघा मुलींना सोबत घेत घरातून निघाला. दोघींना घेऊन तो गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत आल्यावर मागून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला थांबवून त्याच्यासोबत सुमारे एक किलोमीटरपर्यंत गेल्यावर मुलींसह उतरला व जवखेडे शिवारात निर्जनस्थळी चालत गेला. याच भागातील चिंचपुरे (ता. पाचोरा) शिवारातील अरविंद शिंदे यांच्या विहिरीजवळ आल्यानंतर ‘मी तुम्हाला विहिरीत कबुतरे दाखवतो’ असे म्हणून त्याने तनुश्री व शिवण्या या मुलींना विहिरीत डोकावून बघण्यास सांगितले व त्या विहिरीत डोकावून पाहत असतानाच त्याने प्रथम मोठी मुलगी तनुश्री हिला व नंतर लहान मुलगी शिवण्या हिला ढकलले. पाण्यात बुडून या गोंडस मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानेही नंतर आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी मारली असे सांगितले जात असले तरी त्यात तथ्य वाटत नाही. कारण त्याने आपल्या भ्रमणध्वनीवरून मुलींना विहिरीत ढकलल्याचे आपल्या नातलगांना कळवले होते. त्याने आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी मारली असती तर मोबाईल ओला होऊन निकामी झाला असता. त्यामुळे त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
 
पुन्हा मुलगी झाली तर...
केवळ कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना येणाऱ्या आर्थिक अडचणी, तीन मुली व पत्नी चौथ्यांदा गर्भवती, पुन्हा मुलगीच झाली तर त्यांचे पालनपोषण, शिक्षण, कसे होईल? लग्न कसे करायचे? याच विचारात विकास ढाकरे राहत होता. त्याने गावातील काही जणांजवळ मी काही जास्त दिवस जगणार नाही, असे म्हटल्याचीही दबक्या आवाजात चर्चा कानी पडली. 

नशीब बलवत्तर म्हणून पायल वाचली 
विकास ढाकरे हा दोन मुलींना सोबत घेऊन जात असताना त्याने तिसरी मुलगी पायल हिला जाताना आवाज दिला होता. मात्र, पायल खेळण्यात मग्न असल्याने तिने जाण्यास नकार दिला. ती त्यांच्यासोबत गेली असती, तर कदाचित तिचाही तो शेवटचा प्रवास ठरला असता. केवळ पायलचे नशीब बलवत्तर म्हणून ती घरीच थांबली व वाचली. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक ईश्वर कातकडे करीत असून यातून आणखी काय निष्पन्न होते? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora father two daughter murder farm well