दादू, छकुली मला माफ करा...शेतकरी बापाची आत्महत्येपुर्वी चिठ्ठी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

निंभोरी (ता. पाचोरा) : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून पाचोरा शहरातील शाहूनगर (तलाठी कॅलनी) येथील रहिवासी असलेल्या ४४ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (२ फेब्रुवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. 

निंभोरी (ता. पाचोरा) : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून पाचोरा शहरातील शाहूनगर (तलाठी कॅलनी) येथील रहिवासी असलेल्या ४४ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (२ फेब्रुवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पाचोरा येथील भडगाव रोडवरील शाहुनगर भागातील रहिवासी निंबा ऊर्फ छोटू चुडामण पाटील (वय ४४, मूळ रा. बनोटी, ता. सोयगाव) यांनी त्यांची मुलगी जळगाव येथे तर मुलगा व पत्नी शेतात गेलेली असल्याने घरी कोणी नसताना काल (२ फेब्रुवारी) गळफास घेऊन आत्महत्या केली. निंबा उर्फ छोटू पाटील यांच्या त्यांचे नावे बनोटी (ता. सोयगाव) येथे चार एकर जमीन असून विकास सोसायटी व महाराष्ट्र बॅंकेचे त्यांच्यावर सुमारे चार लाखांचे कर्ज होते. पाच वर्षांपूर्वी येथील केमिकल फॅक्टरी बंद पडल्याने त्यांना नोकरी गमवावी लागली होती. त्यानंतर काही दिवस त्यांनी पेट्रोल पंपावर काम केले. मात्र, त्यांची प्रकृती व्यवस्थित राहत नव्हती. अशातच घरची वाढती जबाबदारी आणि वाढलेले कर्ज यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून व्यथित होते. तीन वर्षांपासून शेतात पिकत नसल्याने त्यांच्यावर मोठे कर्ज झाले होते. मुलगी जळगावला कॉलेजमध्ये तर मुलगा व पत्नी बनोटी येथे शेतात गेले होते. मुलगा शेतातून घरी आल्यानंतर वडिलांनी आत्महत्या केल्याचे त्याच्या लक्षात आले. निंबा पाटील येथील विमा प्रतिनिधी व पत्रकार विजय पाटील यांचे मेव्हणे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे यांचे मावसभाऊ होत. 

काय आहे चिठ्ठीत 
निंबा ऊर्फ छोटू पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ‘मी आजारीपणा, नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार घरु नये. मुलगी कांचन, मुलगा दादू, पत्नी सुनीता मला माफ करा’ अशा आशयाची चिठ्ठी त्यांच्या खिशात पोलिसांना आढळून आली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाचोरा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले. आज सकाळी अकराला बनोटी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora loan farmer sucide child and wife note