अंधारात ठेवून अल्पवयीन मुलीचा लावला जात होता विवाह...अन फसवणूक टळली !

भरत बागुल
Saturday, 18 July 2020

संघटनेच्या कार्यकत्यांना हि माहिती मिळाल्याने संघटनेचे कार्यकर्ते वेळीच पोहचल्याने लग्न थांबले व मुलीस आणि आई, वडील यांना नवेनगर या गावी आणण्यात आले.

पिंपळनेर  : नवेनगर (ता. साक्री) येथील भिल समाजाच्या अल्पवयीन मुलीला अंधारात ठेवत गावातील काही स्थानिक मध्यस्थांनी नियोजित 'अर्थपूर्ण` बोलणीतून मुलीच्या वडिलांना आमिष दाखविले. यातून तिचा आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचा उद्योग केला. या वादातून मुलीच्या वडिलांनी मध्यस्थ दलालांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज शनिवारी (ता. १८) दिला. 

पिंपळनेर पोलिस ठाण्यात जय आदिवासी युवा शक्ती संघटना, भिलिस्थान टायगर सेनाचे आबा अहिरे, शिवदास सोनवणे, राजू सोनवणे, श्रवण माळचे, चेतन चौधरी, नानाभाऊ सोनवणे, सुरेश माळचे यांनी मुलीच्या बाजूने तक्रार अर्ज दिला. नवेनगर येथील कन्हय्यालाला ठाकरे यांच्या अल्पवयीन (वय १६) मुलीचा विवाह नागझिरी (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील ललित मधुकर मईनशी (सोनार, वय ३६) घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मध्यस्थ आनंदा बागूल, गोकूळ देवराम भोये (रा. नवेनगर), पिंट्या भदाणे (रा. मालेगाव) यांनी भदाणेच्या शेतात विवाह सोहळा घडवून आणण्याची तयारी केली.

संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली माहिती

ही माहिती संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. ते घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मुलीला अंधारात ठेऊन होणारा विवाह रोखला गेला. तेथून मुलीसह आई-वडीलांना नवेनगरला आणण्यात आले, अशा आशयाचा तक्रार अर्ज साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्याकडे सादर केला. मुलीच्या वडिलांनीही आपली चुक कबुल केली. या प्रकरणी मध्यस्थीतील दोषी दलालांवर गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित संघटनेचे कार्यकर्ते मालेगावला रवाना झाले. या घटनेची माहिती व्हिडिओ क्लिपसह सोशल मीडियावर व्हायरल झाली. आदिवासी बचाव अभियानाचे तालुकाध्यक्ष गणेश गावित व पिंपळनेर शहराध्यक्ष काळू भोये, तसेच सरपंच मन्साराम भोये, पोलिसपाटील भोये आदींनी पोलिस ठाण्यात दोषींवर कारवाईची मागणी केली. 

 संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pimpalaner Marriage of a minor girl Against the broker police complaint