शेतकरी लढा,ऐतिहासिक संघर्षाची भूमी.....पिंपळगाव बसवंत न्यारचं

residentional photo
residentional photo

नाशिक ः कोर्टाचे पिंपळगाव बसवंत, अशी ओळख असलेल्या गावची भूमी शेतकरी संघटनेच्या ऐतिहासिक संघर्षाची म्हणून ओळखली जाऊ लागली. प्रयोगशील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे गाव म्हणूनही राज्यात हे गाव परिचित आहे. साठ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावाला बसवंतेश्‍वर मंदिरामुळे नाव मिळाल्याचे स्थानिक सांगतात. पाराशरी नदीकाठी गाव वसले आहे. 

गावात श्रीराम, हनुमान, पारावरचा गणपती, शनि महाराज, गोसावी वाड्यातील प्राचीन खंडेराव आदी मंदिरे आहेत. ब्रिटिशकालीन विश्रामगृह आहे. 1942 मधील जुनी माध्यमिक शाळा आहे. येथील द्राक्षांपासून तयार होणारे पिबोला हे शीतपेय प्रसिद्ध होते. त्या वेळी भूगोलाच्या पुस्तकाच्या नकाशावर या पेयाचा उल्लेख होता. द्राक्षे, टोमॅटो, कांदा, भाजीपाला उत्पादनात शेतकऱ्यांनी आघाडी घेतली.

रथ मिरवणूकही आकर्षक

  . रामनवमीला यात्रोत्सव होतो. रथ मिरवणूक, कुस्त्यांची दंगल त्याची वैशिष्ट्ये. गावाला सोंगाचे पिंपळगाव याही नावाने खेड्यात ओळखले जायचे. इथला बोहाडा तालुक्‍यात प्रसिद्ध होता. श्रीराम भजनी मंडळात दामूअण्णा कोल्हे, जाधव बाबा आदी ज्येष्ठांसह तरुण आणि महिलांचा त्यात सहभाग असायचा. येथील शिंदेमामा, मधुकर बनकर आदी पहिलवान पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. पूर्वी पंचाचा आडमधून पिण्याचे पाणी दिले जात असे. नंतर कादवा आता पालखेड धरणातून पाइपलाइनने पाणी दिले जाते. 

मोठ्या उत्पन्नाची ग्रामपंचायत 
येथे 1955 मधील वाचनालय आहे. ग्रामपंचायत राज्यात सर्वांत मोठी उत्पन्नाची आहे. 1942 मधील दगडी बांधकाम असलेले पिंपळगाव हायस्कूल लक्ष वेधून घेते. गणेशोत्सव धूमधडाक्‍यात साजरा व्हायचा. नाटिका, वगनाट्य, तमाशा आदी खुल्या मंचावर सादर व्हायचे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, शरद पवार, अभिनेते निळू फुले, कादंबरीकार रणजित देसाई, अभिनेते मधुकर तोरडमल, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, शिवाजीराव भोसले आदींनी गावाला भेट दिली

नाट्य,सांस्कृतिकपण जपणारे गाव.

भालबा केळकर आणि दीनानाथ टाकळकर गावातील महाविद्यालयात आठ दिवस मुक्कामी असत. त्यांनी नाट्य प्रशिक्षण दिले. शिवाय अनेक वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह होतो. श्रीराम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर आणि माळी समाजबांधव असे तीन सप्ताह होतात. खेडलेकर बाबांच्या दिंडीचे स्वागत दर वर्षी गावातर्फे केले जाते. काकासाहेब वाघ यांचा पिंपळगावच्या जडणघडणीत मोठा वाटा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पूर्वी वड, पिंपळ आणि चिंचाचे शेकडो वृक्ष होते. आजही येथे जुने डेरेदार वृक्ष पाहायला मिळतात. वेस ही गावाची शान आहे. वेशीला दोन बुरुज आहेत. गावात पूर्वी शिंदे, गद्रे, दगूनाना मोरे, टकले यांचे वाडे प्रसिद्ध होते. जुन्या गावाने गावपण जपल्याचे दिसून येते. "ऍग्रो टुरिझम'च्या दिशेने गावाची वाटचाल सुरू झाली आहे. 

पिंपेन शाम्पेन होती प्रसिद्ध 
पिंपळगावची पिंपेन शाम्पेन प्रसिद्ध होती. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माधवराव मोरे, प्रल्हाद पाटील-कराड, माधवराव बोरस्ते सक्रिय होते. सत्यशोधक गणपतराव मोरे यांचा सत्कार शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. कोरियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत भारतीय आठ खेळाडूंच्या संघात मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील सागर नागरे, सुलतान देशमुख, सनी सोनवणे, रवींद्र कडाळे यांचा सहभाग होता. हे खेळाडू शेतकरी कुटुंबातील आहेत. 

आमचे महाविद्यालय 1968 मध्ये स्थापन झाले. महाविद्यालयात पाच हजार विद्यार्थ्यांपैकी 60 टक्के विद्यार्थिनी आहेत. कादवा नदीवर "बोटिंग क्‍लब' आहे. आमचा विद्यार्थी अतुल गांगुर्डे नायब तहसीलदार आहे. मी याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. 
-डॉ. आर. डी. दरेकर, प्राचार्य 

आमच्या गावात ऐतिहासिक स्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. तसेच पर्यटन क्षेत्र म्हणून गावाचा विकास व्हावा, अशी अपेक्षा आहे. 
-दिलीप दाते, ग्रामस्थ 

राष्ट्रीय सेवा योजनेतून अनेक उपक्रम आम्ही गावात राबविले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा पुरस्कार मला मिळाला आहे. आमचे अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधून गावाचे नाव चमकवत आहेत. 
-ज्ञानेश्‍वर ढगे, प्राध्यापक 
.... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com