esakal | कोरोना चाचणी देण्यासाठी येत असतांना शिक्षकाचा अपघाती मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना चाचणी देण्यासाठी येत असतांना शिक्षकाचा अपघाती मृत्यू

शासन आदेशानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वॅब देणे प्रत्येकाला बंधनकारक असल्याने राजेंद्र पाटील तळोदा येथे गुरुवारी परतत होते.

कोरोना चाचणी देण्यासाठी येत असतांना शिक्षकाचा अपघाती मृत्यू

sakal_logo
By
धनराज माळी

प्रकाशा ः डामरखेडा (ता. शहादा) गावाजवळील गोमाई नदीवरील पुलाजवळ गुरुवारी (ता. १९) दुपारी चारच्या सुमारास ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तळोदा येथील दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार झाले. प्रकाशा आरोग्य केंद्रात ‘अ’ वर्ग डॉक्टर व स्विपर नसल्याने विच्छेदनासाठी मृतदेह म्हसावद (ता. शहादा) येथे नेण्यात आला. 

पाडामुंडा (ता. धडगाव) येथील आश्रमशाळेचे शिक्षक राजेंद्र पाटील (वय ४०, रा. चिमटावद, ता. शिंदखेडा, ह.मु. श्रीरामनगर, तळोदा) आपल्या दुचाकीने (एमएच १८, बीएस ६९४८) तळोद्याला कडेजात होते. त्याचवेळी शहाद्याकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच २६, बीई १८६९) दुचाकीला धडक दिली. त्यात राजेंद्र पाटील ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाले. घटनेची माहिती कळताच प्रकाशा पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार सुनील पाडवी, पंकज जिरेमाळी, ग्रामस्थ, तळोदा येथील श्रीरामनगरातील रहिवासी, नातलग घटनास्थळी दाखल झाले. 

स्वॅब देण्यासाठी येताना काळाचा घाला 
दिवाळीच्या सुटीनिमित्त राजेंद्र पटील मूळ गावी चिमटावद (ता. शिंदखेडा) येथे गेले होते, तर त्यांची पत्नी, १२ वर्षांची मुलगी व सातवर्षीय मुलासह माहेरी छडवेल कोर्डे (ता. नंदुरबार) येथे गेली होती. शासन आदेशानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वॅब देणे प्रत्येकाला बंधनकारक असल्याने राजेंद्र पाटील तळोदा येथे गुरुवारी परतत होते. मात्र, त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. 

शवविच्छेदन म्हसावदला 
प्रकाशा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वर्ग- ‘अ’ व स्विपरची जागा रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारी वर्षभरापासून, तर स्विपरची जागा दोन ते तीन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे अपघात, कुजक्या अवस्थेतील मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रतीक्षा करावी लागते किंवा दोन्ही कर्मचारी बाहेरून बोलवावे लागतात. राजेंद्र पाटील यांचा मृतदेह अखेर विच्छेदनासाठी म्हसावद (ता. शहादा) येथे न्यावा लागला.  

संपादन- भूषण श्रीखंडे