esakal | विवाहितेचा गुजरातमध्ये संशयास्पद मृत्यू- नातेवाइकांनी व्यक्त केला खुनाचा संशय 
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या पिंप्रीपंचम (ता. मुक्ताईनगर) येथील विवाहितेचा गुजरात मधील वापी येथे रहस्यमय मृत्यू झाला असून, विवाहितेच्या आईवडिलांनी तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

विवाहितेचा गुजरातमध्ये संशयास्पद मृत्यू- नातेवाइकांनी व्यक्त केला खुनाचा संशय 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा


रावेर: दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या पिंप्रीपंचम (ता. मुक्ताईनगर) येथील विवाहितेचा गुजरात मधील वापी येथे रहस्यमय मृत्यू झाला असून, विवाहितेच्या आईवडिलांनी तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. विवाहितेचा शवविच्छेदन अहवाल प्रलंबित असून सध्या अकस्मात मृत्यूची नोंद खोडियार नगर (वापी- गुजरात) येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

याबाबतची आपबिती मुलीचे वडील ज्ञानेश्वर जगन्नाथ महाजन आणि मेहुणे वैभव पाटील (निंबोल, ता. रावेर) यांनी सांगितली. ज्ञानेश्वर महाजन यांची मुलगी प्रतीक्षा (वय २३) हिचा विवाह चंदन ऊर्फ चेतन पाटील (मूळ राहणार केऱ्हाळा, ता. रावेर, हल्ली मुक्काम वापी- गुजरात) यांच्याशी २७ फेब्रुवारीला झाला होता. ३ मे रोजी वापी येथून ज्ञानेश्वर महाजन यांच्या नातेवाइकांनी आणि समाजातील लोकांनी प्रतीक्षाचे निधन झाल्याचे कळवले. मात्र, सासरच्या मंडळींचा साधा फोनही नव्हता. फोन करून विचारणा केल्यावर हृदयविकाराने झोपेतच तिचे निधन झाल्याची सारवासारव सासरच्या मंडळींनी केली. मात्र, तिचा मृतावस्थेतील काळा पडलेला चेहरा फोटोत पाहून संशय आला. ज्ञानेश्वर महाजन, वैभव पाटील आदींनी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे त्यांना झालेला प्रकार सांगितला त्यांनी फोनवरून पोलिसांना महाजन कुटुंबीयांची तक्रार घेऊन शवविच्छेदन करण्याचे निर्देश दिले. तब्बल ३६ तासानंतर शवविच्छेदन होऊन आज (ता. ५) सकाळी पिंप्री पंचम येथे प्रतीक्षावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


गुन्हा दाखल करण्याची मागणी 
ज्ञानेश्‍वर महाजन यांनी सांगितले की, आम्ही खोडियार नगर येथे गेल्यानंतर सर्वच नातेवाइकांनी खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. मृतदेहाचे फोटो पाहूनही गळ्याजवळ तोंडावर आणि नाकावर खुणा दिसून येत आहेत. झालेला प्रकार दडपून अंत्यसंस्कार करण्याची तयारी तिच्या सासरच्या कुटुंबीयांनी चालवली होती. मात्र महाजन कुटुंबीय वेळीच तिथे पोहोचल्यामुळे शवविच्छेदन करून प्रतीक्षाचा मृतदेह वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी तिच्या अंगावर मंगळसूत्र किंवा कानातले कोणतेही दागिने नसल्याचे ज्ञानेश्‍वर महाजन यांनी सांगितले. गेल्या आठ दिवसापासून मृत प्रतीक्षा ही आईवडील आणि बहिणी यांना फोन करून 'मला इथे राहायचे नाही, मला इथून घेऊन जा' असे सांगत असल्याचेही ज्ञानेश्‍वर महाजन यांनी सांगितले. याबाबत मुलीची सासू, पती, जेठाणी आणि जेठ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी ज्ञानेश्‍वर महाजन यांनी केली आहे. 

loading image
go to top