esakal | साक्रीसह तीन किलोमीटर क्षेत्रात "कर्फ्यू' 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

तीन किलोमीटर क्षेत्रात 14 दिवसांसाठी पूर्णतः संचारबंदी लागू झाली आहे. नागरिकांसह जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय झाला आहे. या क्षेत्रालगतचे पाच किलोमीटरचे क्षेत्र हे "बफर झोन' म्हणून घोषित झाले आहे.

साक्रीसह तीन किलोमीटर क्षेत्रात "कर्फ्यू' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साक्री : शहरातील पोळा चौक परिसरातील प्रौढाचा काल (ता. 10) "कोरोना व्हायरस'ची लागण झाल्याने मृत्यू झाला. यानंतर खबरदारीसाठी तालुका प्रशासनाने हा संपूर्ण परिसर, तसेच शहरातील प्रमुख रस्ते "सील' केले. पोळा चौक हा केंद्रबिंदू मानून परिघातील तीन किलोमीटर क्षेत्रात 14 दिवसांसाठी पूर्णतः संचारबंदी लागू झाली आहे. नागरिकांसह जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय झाला आहे. 
या क्षेत्रालगतचे पाच किलोमीटरचे क्षेत्र हे "बफर झोन' म्हणून घोषित झाले आहे. या परिसरातील रहिवाशांना आवश्‍यक किराणा साहित्य, भाजीपाला, औषध आदींचा मागणीनुसार नगरपंचायत व आरोग्य यंत्रणेमार्फत सशुल्क पुरवठा केला जाणार आहे. 

संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण 
शहरातील प्रौढाचा "कोरोना'मुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याचा रहिवास असलेला पोळा चौक परिसर पोलिसांनी तातडीने बंद केला. या संपूर्ण परिसरात आज नगरपंचायतीकडून फवारणी झाली. क्षेत्र निर्जंतुकीकरण करण्यात आले. यासोबतच शहरातील अन्य भाग निर्जंतुकीकरण होतील. 

आजपासून सर्वेक्षणाला वेग 
शहरातील संपूर्ण भागात आजपासून सर्वेक्षण करण्यात येत असून, त्यात प्रत्येक घरात राहणाऱ्यांची संख्या, कुणी बाहेरगावाहून आलेय का, काही त्रास होतोय का, मधुमेह, रक्तदाब आदींचा काही त्रास आहे का?, अशी माहिती संकलित केली जात आहे. 

"ट्रॅव्हल हिस्टरी'चा शोध 
कोरोनाग्रस्त प्रौढाची "ट्रॅव्हल हिस्टरी' शोधण्याचे काम तालुका प्रशासन करत आहे. महिनाभरात तो कुठेही बाहेरगावी गेला नसल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते. मृत प्रौढाच्या कुटुंबातील सदस्य बाहेरगावी गेले नसल्याचे सांगितले जाते. मग "कोरोना'चा संसर्ग झाला कसा? शहरात आणखी काही "कोरोना'चे रुग्ण आहेत की काय, अशी भीती व्यक्त होते. 
 
24 जणांची तपासणी; 34 वर "होम क्वारंटाइन' 
मृत कोरोनाग्रस्त प्रौढाच्या संपर्कातील म्हणजे कुटुंबातील 21 सदस्य आणि कासारे येथील 3, असे एकूण 24 जणांना शुक्रवारी तातडीने धुळ्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यातील सात जणांचे अहवाल "निगेटिव्ह' आले. त्यांना प्रशासनाने संस्थात्मक "क्वारंटाइन' केले असून, अन्य व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. साक्रीतील तीन डॉक्‍टर व स्टाफची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यांना "होम क्वारंटाइन' केले जाईल. मृत प्रौढ बांधकाम मिस्त्री असल्याने संपर्कातील अष्टाणे येथील 30, तर भाडणे येथील 4, असे एकूण 34 जणांना "होम क्वारंटाइन' करण्यात आली. 

loading image