Video : दहा वर्षांचा ऋषिकेश गाजवतो अश्‍वावर हुकूमत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

ऋषिकेशने या ठिकाणी अश्‍वाची कारसोबत शर्यतीची स्पर्धा लावली होती. अश्‍वांच्या विविध शर्यत स्पर्धेत तो भाग घेतो. अश्‍वांच्या सौंदर्य स्पर्धेतही त्याने सहभाग नोंदविला असून, सध्या तो पाचवीत शिक्षण घेत आहे. अश्‍वरॅकवर "लक्ष्मी' नावाच्या घोडीला अतिशय वेगाने पळवत असताना तो चेतक फेस्टिवलच्या "रॅक'वर दिसला. 

सारंगखेडा (ता. शहादा) : लहान वयात मोठे संघर्ष पेलणारा ऋषिकेश अवघ्या दहा वर्षांचा असून, त्याने अश्‍वावर हुकूमत गाजविली आहे. तो अश्‍वावर रपेट मारताना दिसून येतो. आपल्या आयुष्यात अनेक संघर्षांना सामोरे जाऊन तो सर्वांत लहान अश्‍व व्यापारी ठरला आहे. 
सारंगखेडा यात्रोत्सव व अश्‍व बाजार विविधतेने नटलेला आहे. देशातील विविध राज्यांतील व्यापारी अश्‍व खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. येथील अश्‍व बाजारात भट्टगाव (ता. भडगाव) येथील ऋषिकेश पाटील (वय 10) हा अश्‍व बाजारातील सर्वांत कमी वयाचा व्यापारी ठरला आहे. त्याने दोन अश्‍व विक्रीसाठी आणले आहेत. अश्‍वरॅकवर "लक्ष्मी' नावाची अश्‍वावर बसून रपेट मारताना दिसतो. अश्‍वांची डौलदार चाल, अश्‍वाने घेतलेली झेप अशा अनेक कसरतींनी शौकीनांचे डोळ्यांचे पारणे फेडले.

ऋषिकेश त्याच्या आवडत्या "लक्ष्मी' घोडीवर नेहमी दोन तास रपेट मारत असून, यात्रेतील अश्‍वप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. गहूचा भुसा, मसूरचा, बाजरीचा भुसा, मक्‍याचा भरडा करून घोड्यांना खाण्यासाठी तो देतो. आई-वडील त्याला या कामाविषयी प्रेरित करतात. विशेष म्हणजे ऋषिकेशला वयाच्या चौथ्या वर्षापासून घोड्याविषयी संपूर्ण माहिती आहे. त्याला घोड्यांच्या सर्व प्रजाती माहीत आहेत. घोड्यांची आवड-निवड काय असते, हे त्याला पूर्णपणे माहिती आहे. 

ऋषिकेश माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव या शाळेत पाचवीत शिक्षण घेत आहे. त्याचे शिक्षकही त्याला प्रोत्साहित करीत असतात. शाळेसोबत तो घोड्याची आवडही जोपासतो. त्याने या अश्‍व बाजारात दोन घोडे विक्रीसाठी आणले आहेत. तो स्वतः त्या घोड्यांचे संगोपन करत असतो. त्या घोड्यांना शिकवत असतो. त्यात नृत्य करणे, नमस्कार करणे, जमिनीवरचे पैसे उचलणे. वरातीत नवरदेवासाठी तो त्याचे घोडे नेतो. 

हेही वाचा > सात तासांच्या प्रयत्नानंतर दहा फुट अजगराला पकडले

"लक्ष्मी'ची किंमत तब्बल पाच लाख 
शिक्षणासोबत तो त्याच्या आवडीनिवडीचेही मोल योग्यप्रकारे राखून ठेवतो. त्याच्याजवळ "नुकरा' प्रजातीचा घोडा व चार महिन्यांची "लक्ष्मी' नावाची घोडी आहे. ती घोडी त्याने एका लाख 61 हजारांत खरेदी केली होती. आता तिची किंमत तब्बल पाच लाख रुपये आहे. वयाच्या दहाव्या वर्षी त्याला घोडे खरेदीची आवड आहे. अश्‍वांचे संगोपन करून त्यांची विक्री अन्‌ खरेदी तो करतो. तो मागील दोन वर्षांपासून सारंगखेड्यातील घोडे बाजारात येत आहे. वडील, भाऊ वरातीत घोडा घेऊन उदरनिर्वाह करतात. उर्वरित दिवस वडील मजुरीचे काम करतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sarangkheda chetak festival 10 year boy horse