esakal | विद्यार्थ्याने लढवली अजब शक्कल, आणि दाखविले अकल के साथ भैस भी बडी !
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्याने लढवली अजब शक्कल, आणि दाखविले अकल के साथ भैस भी बडी !

शिक्षकांनी दिलेले क्रमिक पुस्तक सोबत नेले आणि चालून पाय दुखू नयेत किंवा कंटाळा येऊ नये म्हणून चक्क म्हशीबरोबर मैत्री केली.

विद्यार्थ्याने लढवली अजब शक्कल, आणि दाखविले अकल के साथ भैस भी बडी !

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा  : लॉकडाउनमुळे शाळा बंद आहेत. शाळेत विद्यार्थी जाऊ शकत नाहीत अन् गुरुजी शिकवू शकत नाहीत. ऑनलाइनचा पर्याय सर्वांनी निवडला पण तो रानावनात पुरेसा उपयोगी नाही आणि मुलगा घरी आहे तर जनावरे चारायला घेऊन जाण्याची पालकांची अपेक्षा. मात्र सातुर्खे (ता. नंदुरबार) येथील सहावीतील विद्यार्थ्याने शक्कल लढविली असून, तो जनावरेही चारत आहे आणि अनोख्या पद्धतीने शिक्षणही घेत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अद्यापही शाळा सुरू झाल्या नाहीत. मात्र मुलांना क्रमिक अभ्यासाची पुस्तके घरपोच मिळाली आहेत. ग्रामीण भागात मुले आई-वडिलांना शेतीकामातही मदत करू लागली आहेत. खासगी शाळेत शिक्षक ऑनलाइनद्वारे शिक्षण देऊ लागले आहेत. शासनाने दूरदर्शन चॅनलच्या माध्यमातून ठराविक वेळेत अभ्यासक्रम सुरू केला आहे. पण तो अभ्यासक्रम किती मुले पाहतात, हे सांगणे कठीण आहे. 

अशाच मुलांमधील दीपक भिल हा सहावीत शिकतो. पण शाळा बंद असल्याने त्याचे वडील त्याला म्हैस चारण्यासाठी पाठवितात. म्हैस व तिच्या रेडकाला रस्त्याच्या कडेला, बांधावर फिरवून म्हशीचे पोट भरल्यावर घरी आणणे हे त्याचे नित्याचे झाले आहे. त्या वेळेत ना मनोरंजन, ना सवंगडी. गप्पा व खेळण्यासाठी सोबत कोणीच नाही. मग या पठ्ठ्याने शिक्षकांनी दिलेले क्रमिक पुस्तक सोबत नेले आणि चालून पाय दुखू नयेत किंवा कंटाळा येऊ नये म्हणून चक्क म्हशीबरोबर मैत्री केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने चक्क म्हशीच्या पाठीवर बसूनच अभ्यास सुरू केला. एकीकडे ही म्हैस गवत खाऊन पोट भरण्यात रमते, तर हा पठ्ठ्या तिच्यावर बसून पुस्तक वाचण्यात दंग असतो. हे दृश्य सध्या परिसरात सर्वांच्या आकर्षणाचे आणि चर्चेचे ठरत आहे. 


मुले राबू लागली शेतात 
या वर्षी प्रत्येक नक्षत्रात पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या शेतात खरिपाची पिके जोमात वाढली आहेत. काही ठिकाणी त्यांची काढणी आणि मळणी सुरू आहे. शिवाय काही ठिकाणी रब्बीची तयारी, कांदालागवड आदी कामे सुरू आहेत. या कामांमध्ये शाळेतील मुले आई, वडिलांना मदत करताना दिसत आहेत. काही मुले शेतीची कामे करीत नाहीत पण पाणी, जेवणाचा डबा शेतात पोच करण्याचे काम करीत आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे