ऋतूचक्राचे बदलते स्वरुपामुळे कडूनिंबाच्या झाडावर अवेळी पानगळ ! 

बळवंत बोरसे
Wednesday, 30 September 2020

मोठ्या डेरेदार झाडांची देठेसह हिरव्या पानांची पानगळ चर्चेचा विषय ठरली आहे. या संदर्भात तज्ज्ञांनी सांगितले की, काही वेळा जास्त पाणी आल्यास किंवा वाळवींमुळे मुळाचे नुकसान होऊन झाडे मरण्यास सुरवात होते.

शहादा : पानगळीचा मोसम नसतानाही म्हसावद (ता. शहादा) गाव परिसरात कडूनिंबाच्या झाडांची हिरवी पाने देठेसह गळून पडत आहेत. त्यामुळे झाडाखाली हिरव्या पानांचे आच्छादन दिसत आहेत. ही झाडे निष्पर्ण झाली असून नव्याने पालवी फुटत आहे. शरद ऋतूतील कोरड्या पानांची पानगळीऐवजी वर्षा ऋतूत ती दिसत असल्याने औत्सुकतेचा विषय ठरली आहे. 

वनस्पतीच्या जीवनचक्रातील पानगळ महत्त्वाचा भाग आहे. वृक्षाची पाने ठराविक ऋतूमध्ये गळतात. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो. पानगळीमुळे वनस्पतीमधील पानांद्वारे होणारे बाष्पीभवन थांबते. हरितद्रव्य कमी होत असल्याने पानाचा रंग पिवळा, लालसर वा तपकिरी होतो. चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांतानुसार 'पानगळ' हे झाडांनी हवामानाशी साधलेलं अनुकूलन आहे. पावसाचं प्रमाण, तापमान, जमिनीचा प्रकार, सूर्यप्रकाशाची उपलब्धता इ. घटकांचा पानगळीवर परिणाम होत असतो. म्हणूनच शरद, हेमंत आणि शिशिर या पावसाळ्यानंतरच्या कोरड्या ऋतूंमध्ये पानगळ होऊन ते निष्पर्ण होतात. सगळी पाने गळून गेली तर प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे झाडाला अन्नपुरवठा व्हावा यासाठी वसंत ऋतूत नवीन पालवी यायला सुरुवात होते. अशाप्रकारे झाड अन्न आणि पाणी यांच्या पुरवठ्याचं संतुलन साधले जाते. 

म्हसावद येथील सती गोदावरीमाता विद्यालयाचे प्रांगण, जिल्हा बँकेसमोर तसेच श्रीरामनगर मधील मोठ्या डेरेदार झाडांची देठेसह हिरव्या पानांची पानगळ चर्चेचा विषय ठरली आहे. या संदर्भात तज्ज्ञांनी सांगितले की, काही वेळा जास्त पाणी आल्यास किंवा वाळवींमुळे मुळाचे नुकसान होऊन झाडे मरण्यास सुरवात होते. ओला कचरा, गटारींचे रासायनयुक्त पाणी मुळांशी झिरपणे, पाण्याचे तापमान अतिशीत बिंदूच्या खाली येणे हे कोरड्या परिस्थितीस प्राधान्य देते. जास्त पाण्यामुळे झाडांची मुळे कमकुवत होऊन द्रुतगतीने मरते. या स्थानिक कारणांनी तेथे पानगळ दिसत आहे. 

नेहमी ओलसर असणाऱ्या जागेतील जुन्या मुळांवर बुरशी येते किंवा वाळवीने नष्ट होतात, नवी मूळ येतात. अवेळीची पानगळ पर्यावरणाशी मानवाने केलेल्या तडजोडीचा परिपाक आहे. 
-प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, वनस्पतीशास्त्रज्ञ, विज्ञान महाविद्यालय, धडगाव. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shadada Due to the change of seasons, the neem tree lost its leaves