पपईवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव; महागड्या औषधी फवारून देखील उपयोग नाही 

कमलेश पटेल
Wednesday, 30 September 2020

डावणी व मोझॅक या आजारामुळे पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत, तर फळाच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे एकूणच त्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

शहादा : तालुक्यात पाऊस व वातावरण बदलाचा सर्वांत मोठा फटका पपई उत्पादकांना बसला असून पपईवर विविध बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यात डावणी व मोझॅक व्हायरसमुळे पाने पिवळी पडत आहेत. पिकासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च अचानक आलेल्या या आजारामुळे वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गात असल्याने पुरता धास्तावला आहे. बाजारात मिळणाऱ्या महागड्या औषधांची फवारणी करून या आजारांना अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. 

शहादा तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ३१५ हेक्टरवर पपईची लागवड करण्यात आली आहे. पपई उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च लागतो. सुरुवातीला लागवडीवेळी उन्हाच्या तीव्रतेने मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे तीन ते चार वेळा रोपे आणून पुन्हा लागवड करावी लागली. महागडे रासायनिक खते, वेगवेगळ्या कंपन्यांची औषध फवारणी, त्याचाच अनेक विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याने साहजिकच खर्चाचे प्रमाण वाढले. दरवर्षी पपईच्या दर कमी अधिक प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सोसावी लागते. लागवडीपासून तर काढणीपर्यंत होणाऱ्या लाखोंच्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. 

बुरशीजन्य आजार 
डावणी व मोझॅक या आजारामुळे पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत, तर फळाच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे एकूणच त्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे पपई उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे. कृषी विभागातर्फे पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून या रोगांच्या नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक घ्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

डाऊनीचा प्रादुर्भाव 
सध्या पपईच्‍या झाडाला फळे लगडलेली आहेत. त्यातच डाऊनीने पछाडले आहे. यात झाडाची पाने पिवळे पडणे, पानांची छत्री बारीक होणे, कोरडी पडणे आदी प्रकार घडत आहेत. पपई पीक मुख्यता पानांच्या छत्रीवर अवलंबून असते या पिकात पानांची छत्री गेल्यास झाडच कमकुवत होते. त्यामुळे उन्हाळ्यात सावली नसल्याने फळांवर चटके बसतात. फळ खराब होऊन आर्थिक नुकसान होते. व्यापारी ही माल घेत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. कृषी विभागाने वेळीच मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. 

पाडळदा परिसरात मोठ्या प्रमाणावर सध्या डावणी व मोझॅक व्हायरसने पपईवर अटॅक केला आहे. बाजारातील विविध महागडे औषधांची फवारणी सुरू आहे. कृषी विभागानेही फवारणी संबंधित मार्गदर्शन करावे. अशी अपेक्षा आहे. 
- विशाल पाटील, पपई उत्पादक शेतकरी, पाडळदा.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shadada Effect of viral disease on papaya crop in farmers