शहाद्यात सहा महिन्‍यानंतर मंडईत भाजीपाला आडत; असे लावले नियम 

दिनानाथ पाटील
Tuesday, 15 September 2020

शहरात १७ मार्चला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने भाजी मंडई परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये आला, त्यामुळे तेथील भाजी विक्रीच्या होलसेल व किरकोळ विक्रेत्यांना अन्यत्र व्यवसाय करण्याचे सांगण्यात आले. प्रतिबंध हटले तरी व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली होती.

शहादा (नंदुरबार) : सहा महिन्यांच्या कालखंडानंतर येथील भाजीपाला आडत विक्रीचा व्यवसाय पालिकेच्या भाजी मंडईच्या मूळ जागी उद्या (ता. १६) पासून पुन्हा सुरू होत आहे. हा व्यवसाय पालिकेने दिलेल्या नियमांचे पालन करीत पहिल्या टप्प्यात सात आडत दुकानदारांमार्फत व्यवहार सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संबंधित व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती भाजीपाला आडत संघटनेचे अध्यक्ष दशरथ चौधरी यांनी दिली.पालिकेने दिलेल्या नियमानुसार हा व्यवसाय सुरू करू असे लेखी पत्र व्यापारी संघटनेने मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दिले आहे. 

शहरात १७ मार्चला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने भाजी मंडई परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये आला, त्यामुळे तेथील भाजी विक्रीच्या होलसेल व किरकोळ विक्रेत्यांना अन्यत्र व्यवसाय करण्याचे सांगण्यात आले. प्रतिबंध हटले तरी व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे लोणखेडा बायपास रोडवर १८ मार्चपासून आडत व्यावसायिकांनी तात्पुरती जागा घेत व्यवसाय सुरू केला. किरकोळ भाजीपाला विक्रीचे विकेंद्रीकरण करण्यात आले. प्रेस मारूती मैदानासह डोंगरगाव रोड व मोहिदा रस्त्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू झालेत. 

म्‍हणूनच मिळाली परवानगी
व्यवसाय बंद असल्याने पालिकेने भाजी मंडईतील कॉंक्रिटिकरणाचे काम पूर्णत्वास नेले. त्यामुळे सप्टेंबरपासून भाजी मंडईतील मूळ जागी आडत व्यवसायाला परवानगी मिळावी याकरीता तालुका भाजीपाला मार्केट व्यापारी कल्याणकारी संस्थेने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेत मागणी केली होती. त्या अनुषंगाने नियमांना अधीन राहून आडत व्यवसायाला सुरुवात करण्यासंदर्भात पालिकेने अडत व्यावसायिकांना सांगितले. 
 
टप्प्या टप्याने व्‍यवसाय 
शहाद्यात अधिकृत अठरा भाजीपाला आडत व्यावसायिक आहेत. त्यांना टप्याटप्याने हा व्यवसाय करावयाचा आहे. त्यानुसार उद्या रात्री सात, दुसऱ्या टप्प्यात पाच व नंतर सहा व्यावसायिक व्यवसाय सुरू करतील. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर येथील भाजी मंडईत पुन्हा खरेदी विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात होत आहे. सध्याची भाजी मंडईतील स्वच्छता अबाधित राखण्याची जबाबदारी पालिकेसोबतच व्यापाऱ्यांची आहे. 
 
असे आहेत नियम 
- आडत व्यापार रात्री सात ते सकाळी आठपर्यंत राहील 
- मास्क वापरणे बंधनकारक राहील. 
- प्रत्येक दुकानावर सॕनिटायझर वापरणे 
- पहाटे मार्केटची दुकाने व मैदान सॅनिटायझ करणे. 
- व्यापारी, शेतकरी आणि हमालांना हातमोजे बंधनकारक 
- थर्मामीटर व ऑक्सिमीटरने प्रवेशद्वारवर तपासणी करणे. 
- दुकानात फिजिकल डिस्‍टन्सिंग पाळणे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada after six month market yard vegetables sales new rules