
राज्यात २००७ मध्ये तत्कालीन गृहमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांनी तंटामुक्त गाव योजना आणली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने राबवून ती यशस्वी केली होती.
शहादा (नंदुरबार) : तत्कालीन गृह राज्यमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांनी सुरू केलेली तंटामुक्त गाव योजना यशस्वी होऊन ग्रामीण भागातील तंटे गावातच मिटू लागले. मात्र, राज्यात मधल्या काळात ही योजना दुर्लक्षित झाली आहे. तंटामुक्त गाव योजना नव्या स्वरूपात पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासोबतच अनेक नावीन्यपूर्ण योजनांचे नियोजन केले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्याचे गृहमंत्री देशमुख रविवारी शहादा दौऱ्यावर आले होते. त्यांची भेट घेऊन तंटामुक्त योजनेविषयी संवाद साधला असता ते म्हणाले, की राज्यात २००७ मध्ये तत्कालीन गृहमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांनी तंटामुक्त गाव योजना आणली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने राबवून ती यशस्वी केली होती. यामुळे राज्यात अनेक गावे तंटामुक्त झाली. गावातील वाद गावातच मिटले. भाऊबंदकी, शेती, वहिवाट, शेतरस्ते आदींचे वाद गावातच मिटल्याने ग्रामीण जनतेचा वेळ व पैसा वाचला. सर्व गावच गुण्यागोविंदाने नांदू लागले होते. शिवाय पोलिस प्रशासनावरचा काहीसा भार हलका झाला होता. या स्पर्धेमुळे गावाला बक्षिसे मिळून विकासकामांना हातभार लागत होता. ग्रामीण भागात चांगलीच जनजागृती झाली होती.
पुन्हा वाद वाढले
अत्यंत प्रभावी ही योजना दुर्दैवाने मधल्या काळात दुर्लक्षित झाली. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा वाद-तंटे वाढल्याचे चित्र आहे. लहान-मोठ्या वादातून ग्रामीण जनतेला पुन्हा पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागत आहे. ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. राज्यात आमच्या तिन्ही पक्षांचे सरकार आले आणि तीन महिन्यांतच कोरोनाची साथ आली. आता साथ आटोक्यात आली आहे, तरी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. शासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे. राज्यात पुन्हा तंटामुक्त गाव अभियानासह अनेक नावीन्यपूर्ण योजनांचे आम्ही नियोजन केले आहे. त्या लवकरच राज्यात राबवू, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
संपादन ः राजेश सोनवणे