esakal | आतापर्यंत पाचशे कुटुंबांनी धरली गुजरातची वाट
sakal

बोलून बातमी शोधा

worker going

पोटाचा प्रश्‍न महत्त्वाचा असल्‍याने जिथे भरेल तेथे जावेच लागेल. या मनोदशेतून स्थलांतर होत असल्याचे चित्र आहे. शहादा तालुक्याच्या उत्तरेकडे मध्यप्रदेश तर पश्चिमेस गुजरात राज्याची सिमा आहे. मध्यप्रदेशात अपेक्षित रोजगाराची व्यवस्था नाही.

आतापर्यंत पाचशे कुटुंबांनी धरली गुजरातची वाट

sakal_logo
By
प्रा.डी.सी. पाटील

शहादा : लॉकडाऊनच्या टप्प्यात आंतर राज्य प्रवासाला सवलत मिळाल्या बरोबर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे गुजरात राज्यात रोजगारासाठी स्थलांतर सुरू झाले आहे. या दहा दिवसात सुमारे पाचशे मजूर  कुटुंबासह खासगी वाहनाने गुजरातच्या विविध भागात रवाना झाले आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

पोटाचा प्रश्‍न महत्त्वाचा असल्‍याने जिथे भरेल तेथे जावेच लागेल. या मनोदशेतून स्थलांतर होत असल्याचे चित्र आहे. शहादा तालुक्याच्या उत्तरेकडे मध्यप्रदेश तर पश्चिमेस गुजरात राज्याची सिमा आहे. मध्यप्रदेशात अपेक्षित रोजगाराची व्यवस्था नाही. मात्र गुजरातमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी व अनेक पर्याय असल्याने येथील मजूर गुजरातलाच जातात. यावर्षी तालूक्यात पावसाच्या संततधारेमुळे खरीपाची पिके मोडकळीस आलीत. त्यातून शेतकरी आर्थिक अडचणीत आला; तर सोबत मजूरांच्या रोजगाराचा प्रश्न ऑगस्टपासून उभा ठाकला. 

दीड महिन्यापुर्वीच सुरवात
दरवर्षी दसरा दिवाळीच्या सुमारास रोजगारासाठी गुजरात राज्यात होणारे मजूरांचे स्थलांतर या वर्षी दिड महिना अगोदरच सुरू झाले आहे. मागील वर्षी रोजगारासाठी गुजरातला स्थलांतरीत झालेले म्हसावद, लोणखेडा परिसरातील सुमारे सहाशे आदीवासी कुटुंब लॉकडाऊनमुळे तेथील गुऱ्हाळ उद्योगसह अन्य रोजगाराचे व्यवसाय २२ मार्चपासून बंद झाल्याने बेरोजगार झाले. रोजगाराची अन्य व्यवस्था नसल्याने या सर्व मजूरांना गुजरात प्रशासनाने नवापूर पर्यंत व तेथून जिल्हा प्रशासनाने त्यांना गावापर्यंत पोहचविले होते. 

म्‍हणूनच सुरू झाले स्‍थलांतर
लोकप्रतिनिधींनी मदत केली होती. येथे मनरेगांतर्गत कामेही तातडीने सुरू केली. मात्र, गावा नजीक कामे उपलब्ध न होणे तसेच वेळेवर मजूरी मिळत नसल्याने स्थलांतर हा एकमेव पर्याय या बांधवांसमोर पुन्हा दिसला. त्यातून गत दहा दिवसांपासून स्थलांतरीतांचे लोंढे खासगी वाहनाने गुजरातला जातांना दिसत आहेत. तेथे ते गुऱ्हाळ उद्योग सुरू झाल्या बरोबर तेथील कामाला जोडले जातील. सध्या तेथे भुईमुग काढणी व शेतातील अन्य कामे करणार करतील. गुऱ्हाळ उद्योग मे महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू असतो. रोजगाराची शाश्वती असल्याने हे मजूर तेथे जाणे पसंत करतात. आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद मिळूनही बांधवांचे नाईलाजाने स्थलांतर करावे लागत असल्याचे चित्र आहे.

गुजरातला येथे होते स्थलांतर-
तलालासह मेंदडा, सातनगीर, सुरवा, माधवपुर, बोरवाव, मानवदर, अत्तलवाडी, बारवा, उपनेता, बोरदेर (सर्व जि. जुनागड), बारडोली व व्यारा तालुका, अंकलेश्वर, सुरत, बडोदा, अहमदाबाद येथे मजूर जात आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image