रात्रीच्‍या अंधारात घरांवर अचानक दगडफेक; निर्माण झाला तणाव

कमलेश पटेल
Saturday, 19 September 2020

शहरातील टेक भिलाटी या आदिवासीबहुल भागात सायंकाळी किरकोळ कारणावरून दोन गटात शाब्दिक चकमक झाली. वादावादी झाल्यानंतर परिसरात शांतता निर्माण झाली होती. मात्र साडे सातच्या सुमारास या भागातील काही घरांवर अचानक तुफान दगडफेक सुरू झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

शहादा (नंदुरबार) : शहरातील टेक भिलाटी परिसरात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन गटात किरकोळ कारणावरून वाद होऊन मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यात दोन ते तीन जखमी झाले असून पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त लावला आहे. शहरातील काही भागात तणावपूर्ण वातावरण असून उर्वरित शहरात शांतता आहे.

शहरातील टेक भिलाटी या आदिवासीबहुल भागात सायंकाळी किरकोळ कारणावरून दोन गटात शाब्दिक चकमक झाली. वादावादी झाल्यानंतर परिसरात शांतता निर्माण झाली होती. मात्र साडे सातच्या सुमारास या भागातील काही घरांवर अचानक तुफान दगडफेक सुरू झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक दगडफेक सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड धावपळ उडाली या दगडफेकीत दोन ते तीन युवक जखमी झाले आहेत.

पोलिस येण्यापुर्वीच ते गायब
अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाली व दगडफेक सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले. यानंतर शहादा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पोलीस येण्यापूर्वीच दगडफेक करणारे हल्लेखोर पसार झाले होते. परिसरातील महिलांनी अत्यंत हृदयद्रावक परिस्थितीचे वर्णन पोलीस पथकासमोर केले. अचानक दगडफेक झाल्यामुळे परिसरात एकच धांदल उडाली होती. सर्वत्र धावपळ सुरू झाली, यात काही महिला व लहान बालकांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती परिसरातील महिलांनी पोलिसांना दिली

दगडफेकीचे कारण अस्‍पष्‍ट
पोलिसांनी टेक भिलाटी व एकलव्यनगर परिसरात मोठा बंदोबस्त लावला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. तर शहरातील अब्दुल हमीद चौक, गरीब नवाज कॉलनी परिसर, तकिया बाजार ,खेतिया रोड, गौसियानगर आदी भागात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने संवेदनशील भागात हल्लेखोरांची चौकशी सुरू केली असली तरी घटनेचे मूळ कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

दोन- तीन दिवसांपासून किरकोळ वाद
गेल्या दोन- तीन दिवसांपासून शहरात किरकोळ घटनांमुळे वाद निर्माण होत आहे. आज सायंकाळी एकलव्यनगर भागात दगडफेकीचे घटना घडल्यानंतर येथील महिलांनी तिव्र संताप पोलिसांसमोर व्यक्त केला. पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. या परिसरात नेहमीच किरकोळ कारणावरून वाद होत असतात असे प्रकार घडत असल्याने पोलिसांनी आजच्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे व शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीतर्फे करण्यात आले आहे आज झालेल्या दगडफेकीच्या शहरात निषेध व्यक्त केला जात आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada disputes between the two groups and throwing stones at houses