निर्दयीपणाचा कळस..श्‍वानाला लटकविले फासावर

कमलेश पटेल
Sunday, 4 October 2020

रस्‍त्‍यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा त्रास कायम असतो. रात्रीच्या वेळी चालत्‍या गाडीवर धावून येण्याचे प्रकार घडतात. पण तो भुंकतोय म्‍हणून आपल्‍याला त्रास होतोय; या भावनेतून मुक्‍या प्राण्यावर निर्दयीपणे अत्‍याचार करत त्‍याला फास लावून झाडाला लटकवून दिल्‍याचा प्रकार घडला.

शहादा (नंदुरबार) : शहरातील प्रेस मारुती मंदिरासमोरील मोकळ्या प्रांगणात एका श्वानाची अज्ञात व्यक्तीने फाशी लावून हत्या केल्याची निंदनीय घटना घडली. या प्रकरणाची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी येथील संकल्प ग्रुप तर्फे शहदयाच्या पोलिस निरीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहरातील प्रेस मारुती मैदानाजवळ असलेल्या वस्तीत एक श्वान त्रास देत असल्याने दररोजच्या त्रास असह्य झाल्याने एका अज्ञात माथेफिरुने श्वानास दोरीचा साहाय्याने फासावर लटकवले. ही घटना घडल्यानंतर आज सकाळच्या सुमारास संकल्प ग्रुपचे पदाधिकारी रस्त्याने जात असताना त्यांना श्वान फासावर लटकलेला दिसला. त्यांनी तात्काळ त्याला खाली उतरवले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

श्‍वानावर अंत्‍यसंस्‍कार
मृत्यूनंतर आपली प्राणीमात्रांविषयीची सहवेदना जागवत संबंधित श्वानावर संकल्प ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. त्याला खड्डा करून पुरण्यात आले. तसेच एका मुक्या जनावराची निर्घुण हत्या केल्याबद्दल या घटनेची चौकशी करण्यात यावी; अशी मागणी संकल्प ग्रुपतर्फे शहादा पोलीस निरीक्षकांना करण्यात आली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada dog tied to a rope and hung from a tree