ग्रामसडक योजनेतील डांबर खाल्‍ले

दिनेश पवार
Thursday, 26 November 2020

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सारंगखेडा- कहाटूळ- लोंढरे- उजळोड- न्यू असलोद हा 10.800 किमी अंतराचा लाखो रुपये खर्चाचा रस्ता सण 2019- 20 मध्ये बनविण्यात आला.

मंदाणे (नंदुरबार) : शहादा तालुक्यातील सारंगखेडा ते न्यू असलोद रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला आहे. रस्त्याला दोन वर्ष देखील होत नाहीत; तोच रस्त्याची निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दुरावस्था झाल्याचे व काही ठिकाणी रस्त्याचे कामच न झाल्याने शासनाची दिशाभूल झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सारंगखेडा- कहाटूळ- लोंढरे- उजळोड- न्यू असलोद हा 10.800 किमी अंतराचा लाखो रुपये खर्चाचा रस्ता सण 2019- 20 मध्ये बनविण्यात आला. परंतु एक वर्षही होत नाही; तोवर सारंखेडापासून लोंढरे गावापर्यंत अनेक ठिकाणी मोठ- मोठी खड्डे व डांबरखडी निघण्याचा प्रकार सुरू झाला आहे. 

पाच वर्ष देखभाल- दुरूस्‍तीचे काय
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामावर लावण्यात आलेल्या फलकावरून हे काम झाल्यावर रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम पाच वर्षांपर्यंत संबंधित ठेकेदाराची असेल. पण फलक नावापुरतेच असल्याचे समोर आले आहे. फलकावर संबंधित ठेकेदाराकडून रस्ता देखभाल व दुरुस्ती तसेच इस्टमेंट देखील लावण्यात आले आहे. पण फलक लावले आहे व त्यानुसार कार्य करायचे आहे; हेच संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार विसरले की काय? असा प्रश्न नागरिक करीत आहे. 

लोंढरेपासून रस्‍ताच नाही
रस्त्याबाबत एवढेच प्रकरण नसून रस्त्यावरील लोंढरे ते न्यू असलोद या गावादरम्यान रस्ताच न बनविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा रस्ता अपूर्ण सोडण्यात आला आहे, की रस्ता पूर्ण झाला असल्याचे दाखविण्यात आला आहे. याबाबतचे रहस्य गुलदस्त्यात आहे. असे असून देखील रस्ता पूर्ण झाल्याचा अहवाल कोणी दिला असेल? मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या रस्त्याबाबतची कल्पना नसावी का? असेही प्रश्न या रस्त्याबाबत उपस्थित होत आहेत. तसेच संबंधित विभागाकडून तालुक्यात या रस्त्याप्रमाणेच या दोन, तीन वर्षांच्या कालावधीत अनेक रस्ते तयार झाले आहेत. त्यात वडाळी- जयनगर, तिधारे- लोहारे, मडकानी- पिंप्राणी- जुनी पिंप्राणी, मंदाणे-कोचरा आदी शहादा तालुक्यातील रस्त्यांचे कामे निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे या रस्यांवर अनेक ठिकाणी मोठ- मोठी खड्डे पडलेले दिसून येत आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada gram sadak yojana fraud and one year road damage