esakal | होमक्‍वारंटाईन होणारे घेताय ऑक्‍सीमीटर; पण जरा सांभाळा
sakal

बोलून बातमी शोधा

oximeter

कोरोना बाधित रुग्णांमध्ये फुफ्फुसाला संसर्ग झाल्यास श्वास घ्यायला त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावते. या रुग्णांना दर दोन तासांनी ऑक्सिजनची मात्रा तपासण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० टक्क्यांहून जास्त असले पाहिजे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

होमक्‍वारंटाईन होणारे घेताय ऑक्‍सीमीटर; पण जरा सांभाळा

sakal_logo
By
प्रा. डी.सी. पाटील

शहादा (नंदुरबार) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना डॉक्टरांसह सर्व सामान्यांच्या तोंडी ऑक्सिमीटर हा शब्द ऐकायला मिळत आहेत. प्राथमिक स्तरावर प्राणवायुचे प्रमाण मोजण्यासाठीचे हे उपकरण आता बहुसंख्य घरांमध्ये दिसत आहे. मात्र, नागरीकांची गरज लक्षात घेऊन या उपकणाची जास्त दरात विक्री होत आहे. तसेच विक्रेता या ऑक्सिमीटरची कोणतीही हमी घेत नसून विक्रीची पावती देत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने याबाबत संबंधित विक्रेत्यांवर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तालूक्यात कोरोनाचा संसर्ग तालूक्यातील ग्रामीण भागापर्यंत पसरला आहे. कोरोना बाधित रूग्ण रूग्णालयात तर पॉझिटीव्ह पण लक्षणे नसलेले रूग्ण होम क्वारंटाईन झालेले दिसून येत आहेत. कोरोना बाधित रुग्णांमध्ये फुफ्फुसाला संसर्ग झाल्यास श्वास घ्यायला त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावते. या रुग्णांना दर दोन तासांनी ऑक्सिजनची मात्रा तपासण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० टक्क्यांहून जास्त असले पाहिजे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्रा ९० पेक्षा खाली असल्यास तात्काळ त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा असा सल्ला सुद्धा दिला जातो. 

होमक्‍वारंटाईन असल्‍यास खरेदी
रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांचे ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठीचे उपकरण उपलब्ध असते. परंतु होमक्वारंटाईन झालेले बहुसंख्य रूग्ण ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी ऑक्सिमिटर विकत घेतात. त्यामुळे ऑक्सिमिटर विकत घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचाच फायदा विक्रेते घेत आहेत.

नेमके कोणते घ्‍यावे संभ्रम
सध्या बाजारात विविध कंपन्यांचे ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत. बहुसंख्य उपकरणांचे बाह्य पॕकिंग वगळल्यास आत एकाच बनावटीचे ऑक्सिमीटर दिसून येत आहे. तसेच या पॕकिंगवर उत्पादनाची तारीख, लॉट नंबर, किंमत आदी काहीही छापलेले नाही. या ऑक्सिमीटरची किंमत चारशे ते दोन हजार रुपयापर्यंत आहे. यातच एका हाताच्या पाचही बोटांना वेगवेगळे ऑक्सिमीटर लावल्यासह वेगवेगळे आकडे दिसत असल्याचे फोटोसह काही माहिती व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नेमका कोणत्या कंपनीच्या ऑक्सिमीटरचा वापर करावा याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. त्यातून ऑक्सिमीटरच्या कंपनीचा बँड आणि उत्पादनाची विश्वासार्हता तपासून पाहणे आवश्यक झाले आहे. सध्या बाजारात चीन येथून आयात केलेले ऑक्सिमीटर मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.

काय आहे ऑक्सिमीटर...
आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी ऑक्सिमीटरचा उपयोग होतो. या ऑक्सिमीटरमध्ये बोट ठेवल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची मात्रा मोजली जाते. त्याचप्रमाणे आपल्या हृदयाचे ठोके देखील या ऑक्सिमीटरद्वारे मोजले जातात. ऑक्सिमीटरमधील सेन्सर हे शरीरातील तापमानावर काम करते. त्यामुळे येणारे परिणामी त्यांच्या तापमानावर अवलंबून असते. 

संपादन ः राजेश सोनवणे