सुनेने रचली सासूची चिता अन्‌ दिला अग्‍निडाग

किशोर चौधरी
Thursday, 24 September 2020

सुन म्‍हणजे घरातली लक्ष्मी मानली जाते. पण याही पलिकडे जावून सुनेला मुलगी मानणारे देखील आहेत. मात्र आपल्‍या पतीसोबत खंबीर उभे राहून सासूला आईसमान मानत तिची सेवा आणि तिच्या मृत्‍यूनंतर स्‍मशानभुमीत जाणारे कोणी नाही म्‍हणून पतीसोबत स्‍मशानभुमीत गेली सासूची चिता रचत अग्‍निडाग देण्यापर्यंतचे कार्य केले; तिची ही कहाणी 

शहादा (नंदुरबार) : बामखेडा (ता. शहादा) येथील प्रा. डॉ. गणेश बन्सी पाटील यांची पत्‍नी स्‍वाती पाटील हिची अंगावर काटा आणणारी व अभिमानाने मान उंचाविणारी घटना आहे. सासूला कोरोनाची लागण झाल्‍यानंतर तिची तब्‍बेत खालावत असताना देखील न डगमगता उपचारासाठी धावपळ केली. पण सासू सोडून गेली म्‍हणून खचलेल्‍या पतीला तिने धीर देत सासूची शेवटपर्यंत सेवा करण्याचे काम स्‍वाती यांनी केले.

बामखेडा येथील प्रा. डॉ. गणेश बन्सी पाटील यांचे आई व वडील बन्सी सोमाजी पाटील हे दुर्दैवाने कोरोना आजाराच्या विळख्यात सापडले. त्या दोघांना नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तीन- चार दिवस उपचार चालू असताना व सर्व काही सुरळीत असताना गणेश पाटील यांच्या आईची ऑक्सिजन लेव्हल एकदम कमी होवू लागली. यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सुरत येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

पतीसोबतच गेली
गणेश पाटील हे त्याच्या आई- वडिलांचे एकुलते एक चिरंजीव असल्याने आईसोबत ते एकटेच जात असताना त्यांची अर्धांगिनी स्वाती पाटील या देखील त्‍यांच्यासोबत निघाल्या. गणेश पाटील यांच्या आईंना सुरत (गुजरात) येथे उपचारासाठी दाखल केले. तेथेही दहा- बारा दिवस तिने आपल्या सासूची काळजी घेत पतींना आपल्या आई चांगल्या होतील, आपण त्यांना थोड्याच दिवसात घरी सुखरूपपणे घेयून जावू असा धीर देत राहिल्‍या. पण नियतीला ते काही मंजूर नसावे बहुतेक कि काय, त्याच्या आईची तब्बेत जास्तच खालावली. तेथील डॉक्टरांनी हि आशा सोडली व त्यांना घरी घेयून जाण्याचे ठरले. पण कोरोना असलेल्या व अत्यवस्त अवस्तेत आईला घरी कसे घेयून जावे म्हणून त्यांनी परत शहादा येथे खासगी कोविड सेंटरमध्ये दाखल करत उपचार सुरु केले. पण दैवाला तेही मंजूर नसावे व दुसऱ्या दिवशी सासूची प्राणज्योत मालवली.

कोणी नाही म्‍हणून गेल्‍या स्‍मशानभुमीत
आईच्या निधनामुळे गणेश पाटील हे पोरके झाले. त्यावेळी स्वाती पाटील हि त्यांच्या पाठीशी हिमतीने उभी राहिली व आपल्या पतींवर कोसळलेल्या संकटात पुढे काय करावयाचे? याबाबत त्‍याचे वडिल यशवंत भाई (तीखोरे) व नातेवाईकांना हाताशी धरून पुढील नियोजनास सुरुवात केले व सोबत पतीला धीर देत राहिल्या. आईच्या अंत्‍यविधी कोविड नियमावलीनुसार शहादा येथेच करण्याचे ठरले. पण ती कशी व कोणी करावे? हा मोठा प्रश्न उभा राहिला. त्यावेळेस पतीसोबत स्‍‍मशानभुमीत जाण्याचा निर्णय स्वाती पाटील हिने घेत पीपीई किट परिधान केले. सासूबाईंना दवाखान्यातून रूग्‍णवाहिकेमध्ये ठेवण्यापासून तर स्मशानभूमीत नेऊन अग्‍निडाग देण्यापर्यंत सर्व विधी पार पाडला.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada mother in law gave the cheetah a fire