esakal | आणखी एक नवा डाउनी व्हायरस; काय आहे हा प्रकार पहा 
sakal

बोलून बातमी शोधा

papaya

पपईवर सध्या डाउनी व विविध विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषता एप्रिल महिन्यात लागवड केलेल्या पपईला फळधारणा झाल्याने फळाला सततचा पावसामुळे अळीने पोखरल्याने फळ वाया जात आहे. 
-विशाल पाटील, पपई उत्पादक शेतकरी, पाडळदा 

आणखी एक नवा डाउनी व्हायरस; काय आहे हा प्रकार पहा 

sakal_logo
By
कमलेश पटेल

शहादा : तालुक्‍यातील पपईला सध्या फळधारणा होत असून, याच काळात डाउनी व्हायरस, रिक्षा किडीसह विविध विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे पपईची फुलगळ होत असून, फळधारणेवरही त्याच्या परिणाम होत आहे. शिवाय सतत आठ ते दहा दिवस चाललेल्या संततधारेमुळे पपईला सुरवातीस लागलेल्या फळात अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पहिले फळ वाया गेले. आधीच संकटात सापडलेला शेतकरी पिकांवर पडणाऱ्या विविध विषाणूजन्य आजारांमुळे धास्तावला आहे. 
पपई उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च लागतो. या वर्षी शेतकऱ्यांनी 14 ते 16 रुपयांपर्यंत पपई रोपांची खरेदी करून एप्रिल, मेमध्ये लागवड केली. सुरवातीला उन्हाच्या तीव्रतेने मररोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे तीन ते चार वेळा रोपे आणून पुन्हा लागवड करावी लागली. त्याला उन्हाच्या संरक्षणापासून क्रॉप कव्हर लावण्यात आले. त्यासाठी प्रतिरोप तीन ते चार रुपये खर्च आला. महागडे रासायनिक खत, वेगवेगळ्या कंपन्यांची औषध फवारणी, त्यात व्हायरस तसेच इतर आजारांमुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने सहाजिकच खर्चाचे प्रमाण वाढले. दर वर्षी पपईचा दर कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने दर कमी झाल्यावर शेतकऱ्याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागते. 

"डाउनी'चा प्रादुर्भाव 
ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात पपई पिकाची लागवड केली आहे, हे पीक सध्या फळधारणेच्या अवस्थेत आहे. त्या पिकाला सध्या डाउनीने पछाडले आहे. यात झाड पिवळे पडणे, झाडाची छत्री बारीक होणे, कोरडी पडणे आदी प्रकार घडत आहेत. पपई पीक मुख्यतः पानांच्या छत्रीवर अवलंबून असते. या पिकात पानांची छत्री गेल्यास झाडच कमकुवत होते. त्यामुळे उन्हाळ्यात सावली नसल्याने फळांवर चटके बसल्याने फळ खराब होऊन आर्थिक नुकसान होते. त्या वेळी व्यापारीही हा माल घेत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. कृषी विभागाने वेळीच मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

तालुक्‍यात सर्वाधिक लागवड.. 
दरम्यान, तालुक्‍यातील बहुतांश शेतकरी पीकपद्धतीत बदल करून फळबागेकडे वळले आहेत. सिंचन क्षेत्रही बऱ्यापैकी असल्याने दिवसेंदिवस फळपिकांचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात चार हजार हेक्‍टरवर पपईची लागवड झाली असून, सर्वाधिक लागवड शहादा तालुक्‍यात तीन हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. 

संपादन : राजेश सोनवणे

loading image
go to top