पोटभरण्यासाठी स्‍वस्‍त धान्य मिळावे, यासाठी आनंदला हवाय बच्चनरूपी अधिकारी 

दिनानाथ पाटील
Friday, 14 August 2020

जुन्या सायकलीचे चाक, चैन व पायडल असे साहित्य गोळा करून कमी खर्चात साधन तयार केले. त्यातून व्यवसायाला सुरवात केली, पण लॉकडाऊनने उत्पन्नच बंद झाले.

शहादा  : सायकलीवर पायडल मारून पावशी, चाकू, सुरी, अडकित्ता यांना धार देत स्वयंरोजगाराने चरितार्थ चालविणारा व्यावसायिक लॉकडाउनमुळे संघर्षाला तोंड देत आहे. ‘जंजीर’ चित्रपटातील ‘चक्कु छुरिया तेज करा लो’ गाणाऱ्या नायिकेला गुंडांपासून वाचविण्यासह जेवणाची व्यवस्था करण्यासाठी नायक अमिताभ बच्चन पोलिस अधिकाऱ्याच्या रूपाने पुढे आला होता. मात्र, सात जणांचे कुटुंब चालविणाऱ्या शहाद्यातील आनंदने शासकीय शिधा मिळण्यासाठी एखादा बच्चनरूपी अधिकारी, लोकप्रतिनिधी पुढाकार घेईल, का असा प्रश्‍न विचारला आहे. 

येथील प्रकाशा रस्त्यावर वीज वितरण कंपनीलगत राहणारा आनंद प्रकाश सकर पावशी, चाकू, सुरी, अडकित्ता, कैची यांना धार देत स्वयंरोजगाराने दिवसभरात दीडशे ते दोनशे रुपये कमवून वयोवृद्ध आई-वडिलांसह बहिणीचे संगोपन व तीन भावांचे शिक्षण करतो. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यवसाय थांबला आहे. सवयीमुळे अन्य कामे करताना येणाऱ्या अडचणींमुळे जगावे कसे, हा प्रश्न आहे. हातावर मोलमजुरी करणाऱ्या लोकांना पोट भरण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य द्यावे, अशी अपेक्षा आनंदसह सर्व वंचितांची आहे. 

वडिलांची शारीरिक परिस्थिती गंभीर आहे. त्यातून कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी आनंदवर आहे. भाऊ शिक्षणापासून वंचित राहू नये यांसह कुटुंबाच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारीचे भान राखत आनंदने वेगळा मार्ग स्वीकारला आहे. त्याने पारंपरिक व्यवसाय सोडून चाकू, सुरी अशा लहान लहान वस्तूंना धार देण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी त्याने जुन्या सायकलीचे चाक, चैन व पायडल असे साहित्य गोळा करून कमी खर्चात साधन तयार केले. त्यातून व्यवसायाला सुरवात केली, पण लॉकडाऊनने उत्पन्नच बंद झाल्याचे आनंद याने सांगितले. 

पोटभरण्यापुरते स्‍वस्‍त धान्य तरी द्यावे 
म्हशी भादरण्यासह पारंपरिक माठ बांधण्याचे काम करणारे सुमारे २५ ते ३० कुटुंब शहाद्यात आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी वैरणाअभावी म्हशी पाळणे कमी केल्याने हा व्यवसाय आता लोप पावत चालला आहे. या कुटुंबांना राज्य शासनाच्या स्वस्त धान्य किंवा इतर कुठल्याही योजना मिळत नाहीत. त्यामुळे अनेक योजनांपासून हे सर्व कुटुंब वंचित आहेत. शासनाने पोट भरण्यापुरते तरी महिन्याचे स्वस्त धान्य द्यावे, अशी रास्त अपेक्षा या सर्वांची आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada poor hand-wringing help by self-sufficient grain stomach