प्रवेशपूर्व अभ्यासक्रम कमी केल्यास गुणवत्तेत विद्यार्थी मागे पडतील ! 

प्रा. डी. सी. पाटील
Friday, 5 June 2020

नंदुरबार आदिवासी जिल्हा आहे. येथील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनावर अवलंबून असतात. हाय फाय कोचिंग क्लासची संकल्पना येथे नाही. अभ्यासक्रम कमी केल्यास राष्ट्रीय पातळीवर आमचे विद्यार्थी कमी पडतील. हा एक प्रकारे ग्रामीण भागातील मुलांवर अन्याय राहणार आहे. अभ्यासक्रम कमी करताना प्रवेशपूर्व परीक्षांचा भाग विषयातून कमी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. 
- प्रा. भरत देसले, जिल्हाध्यक्ष, नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटन 

 

शहादा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात यंदा शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार हे अनिश्चित आहे. त्यातच सत्र कालावधी कमी होणार असल्याची चर्चा आहे. यातून अभ्यासक्रम कमी झाल्यास अकरावी व बारावीचे विद्यार्थी बारावी नंतरच्या प्रवेशपूर्व परीक्षांमध्ये गुणवत्तेत मागे पडण्याची भिती आहे. त्यामुळे अभ्यासक्रम कमी करताना प्रवेशपूर्व परीक्षांमधील अभ्यासक्रम कमी होणार नाही याची काळजी शिक्षण तज्ज्ञांनी घ्यावी अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा-महाविद्यालये कधी सुरू होणार हे स्पष्ट नाही. शैक्षणिक सत्राचा कालावधीही व सुट्याही कमी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर इयत्ता पहिली ते बारावीच्या प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून युद्धपातळीवर कामकाज सुरू असल्याची चर्चा आहे. शालेय शिक्षण विभागाने शाळांसाठी नियमावली तयार करण्याचे कामकाज सुरू ठेवले आहे. 

दरवर्षी शैक्षणिक वर्ष हे दहा महिन्यांचे असते. यंदा ते कमी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे अभ्यास मंडळातील तज्ज्ञांमार्फत सर्वच शालेय वर्गांचा अभ्यासक्रम कमी करण्यासाठी कामकाज सुरू करण्यात आल्याचे समजते. प्रत्येक वर्गाचा वीस ते पंचवीस टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचे नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र तज्ज्ञ नियुक्त केल्याचीही चर्चा आहे. 

बारावी विज्ञान नंतर वैद्यकीय व आय.आय.टी.च्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षांना सामोरे जावे लागते. या परीक्षांचे दायित्व सि.बी.एस.ई. बोर्डकडे सोपविण्यात आल्याने त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षा घेतल्या जातात. राज्य परीक्षा मंडळाने अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित विषयांचा अभ्यासक्रम कमी केला तर आपले विद्यार्थी उपरोक्त परीक्षांच्या गुणवत्तेत निश्चित मागे पडतील. त्यातून त्यांना तंत्रशिक्षण व वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे अभ्यासक्रम कमी करण्यासाठी नेमलेल्या शिक्षण तज्ज्ञांनी नीट, जेईई परीक्षांना आवश्यक भाग वगळला जाणार नाही याची काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada Reducing pre-admission courses will make students lag behind in quality!