सातपुड्यातील एकलव्यांना मिळाले गुरू; तिघा मित्रांचे कार्य

प्रा. डी. सी. पाटील
Thursday, 8 October 2020

लॉकडाऊनमध्ये व्यक्तीगत व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजहिताचे अनेक नवे प्रयोग प्रयत्न समोर आले आहेत. असाच एक उमेद देणारा प्रयत्न सुरू आहे; तो नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये.

शहादा (नंदुरबार) : सातपुड्याच्या कुशीतील त्या एकलव्यांना मिळाले गुरू. कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने तिघा मित्रांनी धडगाव परिसरातील ७० खेळाडूंना एकत्रित करीत ‘नवी उमेद नंदुरबार सातपुडा' म्हणत आहे. त्या संसाधनाचा वापर करीत मैदानी खेळ व कसरतींचा सराव घेत आहेत. यातून भविष्यातील एखादा गुणी आॕलंम्‍पिक खेळाडू सातपुड्याच्या कुशीतून तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

लॉकडाऊनमध्ये व्यक्तीगत व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजहिताचे अनेक नवे प्रयोग प्रयत्न समोर आले आहेत. असाच एक उमेद देणारा प्रयत्न सुरू आहे; तो नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये. धनाजी बुद्रुक व तलावडी या गावात तीन अवलिया तब्बल ७० विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण देत आहेत.

अन्‌ मुलांचा केले एकत्र
धडगाव तालुक्यात राहणाऱ्या ॲड. छोटू वळवी यांना ही कल्पना सुचली. त्यांनी मनोहर पाडवी आणि विलास वळवी या मित्रांसमोर ती मांडली. यातले विलास वळवी हे धुळ्यात क्रीडा प्रशिक्षक आहेत. या तिघा मित्रांनी धडगाव तालूक्यातील सातपुड्याच्या कुशीतील गाव-पाड्यांवरील मुलांना एकत्र आणले. शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी असल्याने मुलं घरीच होती. त्यांचा खेळांचा सरावही थांबला होता. धनाजी बुद्रुक (ता. धडगाव) येथे या मित्रांनी ७० होतकरू खेळाडूंना एकत्र आणले. यात आपापल्या शाळा, महाविद्यालयात विविध क्रीडा प्रकारांमध्ये निपुण विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

स्‍वप्न उराशी बाळगून
सातपुड्याच्या दुर्गम भागात अनेक खेळाडू आहेत. त्यांना दुपारी दोन तास पाठ्य पुस्तकातले शिक्षणही दिले जाते. नंतर खेळाचा सराव. हा सरावसुद्धा शास्त्रशुद्ध आणि खडतर. कुठलाही मुलाहिजा न बाळगता मुलांकडून तयारी करून घेतली जात आहे. यात मुलगा- मुलगी असा भेद नाही. १५ जूनपासून सुरू असलेले हे प्रशिक्षण स्वयंप्रेरणा आणि समाजहितासाठी सुरू आहे. या मुलांमध्ये कोणाला पोलिस व्हायचे आहे; तर कोणाला जागतिक दर्जाचा धावपटू. साधनसुविधांचा अभाव आहे. पण मुलांचा जोश तुसभरही कमी नाही. लॉकडाऊनमधेही प्रशिक्षण मिळत आहे याचे समाधान या मुलांना आहे.

क्रीडा विभाग अनभिज्ञ
एकीकडे या मित्रांच्या कामाचे गुणगाण परिसरातील नागरीक करीत असताना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला याची माहिती मिळू नये याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. क्रीडा विभागाने किमान आवश्यक क्रीडा साहित्य या खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

सातपुड्यात पुन्हा सुरू झालाय क्रीडा सराव. यातून आमच्या क्रीडा गुणांना निश्चित वाव मिळेल.
- कावेरी परदेशी, धडगाव, जि. नंदुरबार 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada satpuda aria student teaching sport three friend