
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीत खंड पडू नये, यासाठी शिक्षकांचा हा उपक्रम स्तुत्य असून, यात सातत्य राखणे गरजेचे आहे. यातून अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडवून त्यांना मार्गदर्शन करावे.
- मोतीलाल पाटील, अध्यक्ष
शहादा (नंदुरबार) : शहरातील शेठ व्ही. के. शहा विद्यालयातील शिक्षक कोरोना संकटात शासकीय नियमांचे पालन करीत ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू न देता ज्ञानदानाचा अखंड वसा गृहभेट या प्रकल्पातून जपला आहे.
लॉकडाउनमुळे शाळा बंद झाल्या असून, आता ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यात शिक्षकांचे काम मात्र अधिकच वाढले आहे. कोरोना सर्वेक्षण, ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणाची जबाबदारी ते यशस्वीरीत्या पेलत आहेत. कोरोना काळात शासनाने ऑनलाइन शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापन, यूट्यूबच्या माध्यमातून शैक्षणिक व्हिडिओ, ऑनलाइन टेस्ट, व्हॉट्सॲप ग्रुपवर अभ्यास पाठवणे आदी वेगवेगळ्या मार्गांनी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचविले.
शिक्षकांचे गट पोहचतात घरी
विद्यार्थी सांगितलेला अभ्यास पूर्ण करीत आहे की नाही, अभ्यासात येणाऱ्या विविध अडचणी त्या सोडविण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य आय. डी. पटेल यांनी पालक विद्यार्थी गृहभेट प्रकल्प कार्यान्वित केला. शिक्षकांनी वेगवेगळे गट करून थेट विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोचून त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी, गृहपाठ तपासणे, तसेच कोरोना काळात घ्यावयाची काळजी, विद्यार्थ्यांना शिकविण्याचा, त्यांचे मानसिक आरोग्य राखण्याच्याही प्रयत्न शिक्षकांमार्फत होत आहे. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मोतीलालतात्या पाटील, उपाध्यक्ष हिरालाल पटेल, संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त केले.
कोरोनामुळे शिक्षणाचे स्वरूपच बदलून गेले आहे. शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाउन काळात व्हॉट्सॲप ग्रुप, शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून शिकवले जात आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, मार्गदर्शन करण्यासाठी गृहभेट हा प्र६कल्प सुरू केला आहे.
- आय. डी. पटेल, प्राचार्य शहा विद्यामंदिर, शहादा
संपादन ः राजेश सोनवणे