शहादा तालुक्यातील धुरखेडा येथे विस कावळे मृतावस्थेत सापडले   

लोटन धोबी
Tuesday, 9 February 2021

वनविभागाच्या पथकाने मृत कावळे सीलबंद अवस्थेत गोळा करून तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविणार आहे.

शहादा : तालुक्यातील धुरखेडा येथे मंगळवारी (ता.९) पंधरा ते वीस कावळे मृत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर कावळ्यांचा मृत्यू विषारी अन्न खाल्ल्याने की अन्य काही कारणाने किंवा बर्ड फ्ल्यूने झाला, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृत कावळे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. 

आवश्य वाचा- गौण खनिजाची रॉयल्टी चुकविणे सरपंचासह सात जणांना पडले महागात 

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून प्रशासनातर्फे युद्धपातळीवर क्लिक अभियान राबविले जात आहे. आज दुपारी पाचच्या सुमारास गावातील एका शेताजवळ व परिसरात मोठ्या संख्येने कावळे मृत अवस्थेत असल्याचे आढळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. धुरखेड्याचे सरपंच गणेश चौधरी त्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर विभागाचे वनपाल दीपक परदेशी, सुभाष मुकडे, डी. डी.पाटील, वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार जिल्हाचे पक्षी मित्र सागर निकुंभे व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात २० पेक्षा अधिक कावळे मृत आढळले आहेत. वनविभागाच्या पथकाने मृत कावळे सीलबंद अवस्थेत गोळा करून तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविणार आहे. अहवालानंतर कावळ्याच्या मृत्युमुखी पडण्याचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल एस के खुणे यांनी दिली. 

आवर्जून वाचा- शिक्षक पती-पत्‍नीचे निवृत्तीनंतर धाडस; पासष्टीच्या वयात त्यांनी ‘कळसूबाई’चे शिखर केले सर 
 

अचानक एवढ्या मोठ्या संख्येने एकाचवेळी कावळे मृत्युमुखी पडल्याचे आढळल्याने संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. वन विभागामार्फत बुधवारी (ता.१०) संपूर्ण परिसरात अधिक तपासणी होणार असून आणखी काही कावळ्यांचे मृतदेह परिसरात आढळून येतात का? याबाबत विशेष पाहणी होणार आहे. दिवसभर या घटनेची गावात चर्चा सुरू होती. तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण अद्याप नाही मात्र आजच्या घटनेमुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada twenty crows dead sensation administration