शिंदखेडा तालुक्यात लवकरच बायो सीएनजी प्रकल्प 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

वरपाडा रस्त्यालगत असलेल्या दहा एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सिंधूदेवी क्लिनफ्युएल, शिंदखेडा प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड व मुंबई येथील एमसीएल कंपनी संयुक्तपणे या प्रकल्पाची उभारणी करणार आहे.

शिंदखेडा (नंदुरबार) : कचऱ्यापासून बायो सीएनजी गॅस, कंपोस्ट खते आणि औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारे एफओ आणि एलडीओ स्वयंपाकासाठी लागणारे स्वच्छ इंधन यांची निर्मिती करणारा ५० कोटींचा प्रकल्प शिंदखेडा तालुक्यात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सिंधुदेवी क्लिनफ्युएल कंपनीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी दिली. 

वरपाडा रस्त्यालगत असलेल्या दहा एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सिंधूदेवी क्लिनफ्युएल, शिंदखेडा प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड व मुंबई येथील एमसीएल कंपनी संयुक्तपणे या प्रकल्पाची उभारणी करणार आहे. यात घराघरांत निर्माण होणारा कचरा, कपाशीच्या काड्या, केळीचे व पपईचे खांब, झाडाच्या तुटलेल्या फांद्या, शेतातील धसकटे, उसाचे पाचट, विकली न जाणारी शेतातील पिके, कागद, प्लॅस्टिक यांसह ओला व सुका कचरा कच्चा माल म्हणून वापरला जाणारा आहे. हा कचरा एक हजार रुपये प्रतिटन या दराने कंपनी विकत घेणार आहे. कचरा जमा करण्याचे काम कंपनीतर्फे गावपातळीवर करण्यात येणार आहे. रोज किमान १०० टन कचरा या प्रकल्पासाठी लागणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी साडेतीन ते चार हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. ‘एमसीएल’चे संचालक योगेश पवार, शिंदखेडा प्रोड्युसर कंपनीचे डॉ. पृथ्वीराज पाटील, साहेबराव मोरे, भास्कर पाटील, भूषण पाटील, ॲड. वसंत पाटील, दीपक जगताप, तालुकाप्रमुख गिरीश देसले, संतोष देसले, भाईदास पाटील आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shindkheda 50 carrore project in bio cng