esakal | ऑक्सिजन सिलिंडर मिळाली..आता डॉक्टरांसाठी प्रयत्न सुरू !

बोलून बातमी शोधा

doctor serch
ऑक्सिजन सिलिंडर मिळाली..आता डॉक्टरांसाठी प्रयत्न सुरू !
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती व्हावी म्हणून ‘सकाळ’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केल्याने मंगळवारी (ता. २७) रात्री आरोग्य प्रशासनाने दहा सिलिंडर उपलब्ध करून दिली आहेत. आता एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. गुरुवारी (ता. २९) ऑक्सिजनयुक्त बेड सुरू करण्यात येईल, असा प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू आहे.

शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजनयुक्त ६० बेडच्‍या निर्मितीचे काम पूर्ण होऊन २० दिवस झाले, मात्र ऑक्सिजन सिलिंडर व एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी नसल्याने कोविड सेंटर सुरू होऊ शकले नव्हते. आमदार जयकुमार रावल व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांना धारेवर धरल्याने नंतर मंगळवारी (ता. २७) रात्रीतच दहा सिलिंडर उपलब्ध करून दिली आहेत. यापूर्वीच हस्ती बॅंकेने पाच भरलेली सिलिंडर उपलब्ध करून दिली आहेत. अजून २५ भरलेली सिलिंडर बॅकअपसाठी लागणार आहेत. शिंदखेडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यात डॉ. भूषण मोरे तालुका वैद्यकीय अधिकारी असून, डॉ. हितेंद्रसिंह देशमुख दोंडाईचा कोविड केअर सेंटरचे निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत. आता उरलेल्या चार वैद्यकीय अधिकाऱ्यांना आळीपाळीने दिल्यास तो प्रश्नही मार्गी लागणार आहे.

शिंदखेडा कोविड केअर सेंटर येथे १५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाली आहेत. एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदखेडा तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड चाचणीत कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्ण आढळल्यास शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, अशा सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

-डॉ. विक्रमसिंह बांदल, उपविभागीय अधिकारी, शिरपूर

संपादन- भूषण श्रीखंडे