
माळी यांचा मृतदेह बाहेर काढत असतानाच सावळदे येथील पुलावरून वृद्धाने नदीपात्रात उडी टाकली. या प्रकाराने एकच खळबळ माजली.
शिरपूर : नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढत असतानाच पुलावरून वृद्धाने नदीत उडी टाकल्याची घटना सावळदे (ता. शिरपूर) येथे घडली. उशिरापर्यंत शोध घेऊनही वृद्धाचा शोध लागू शकला नाही.
वाचा- बंद घरात गुटख्याचे घबाड, पोलिसांनी टाकला रात्री छापा आणि सापडला पाच लाखा माल
येथील करवंद नाका परिसरातील रहिवासी तथा सावता हॉटेलचे संचालक प्रवीण भगवान माळी (वय ४३) बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता. दुपारी तापी नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचे नातलग सावळदे येथे पोचले. तेथे पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. तासभर परिश्रम घेतल्यानंतर प्रवीण माळी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. शरद भाऊराव पाटील याने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
वृद्धाची उडी
माळी यांचा मृतदेह बाहेर काढत असतानाच सावळदे येथील पुलावरून वृद्धाने नदीपात्रात उडी टाकली. या प्रकाराने एकच खळबळ माजली. उडी टाकण्यापूर्वी संबंधिताने खिशातील पाकीट पुलावर टाकले. त्यातील कागदपत्रांवरून उडी टाकणाऱ्याचे नाव विश्वास त्र्यंबक पाटील (वय ६१) असून, ते वलवाडी (धुळे) येथील यशोधन कॉलनीतील प्लॉट क्रमांक ५३ मधील रहिवासी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाकिटात त्यांचे छायाचित्रही आढळले. लागलीच नदीपात्रात उडी टाकलेल्या जागी शोध सुरू झाला. मात्र, उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. अंधारामुळे शोधकार्य थांबविणे भाग पडले.
संपादन- भूषण श्रीखंडे