esakal | "रुमित केमिसिंथ' कंपनी ठरली शिरपूरकरांसाठी "जिवंत बॉम्ब' 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

"रुमित केमिसिंथ' कंपनी ठरली शिरपूरकरांसाठी "जिवंत बॉम्ब' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर ः वाघाडी (ता. शिरपूर) गावालगत असलेली रुमित केमिसिंथ आजच्या स्फोटानंतर जणू शिरपूरकरांसाठी जिवंत बॉम्बच ठरली. यापूर्वी वाघाडी- बाळदे रस्त्यावर असलेला एक कारखाना एवढीच परिसरासाठी या उद्योगाची ओळख होती. 
यापूर्वी मॉं बिजासनी पेट्रोकेमिकल्स या नावाने असलेला हा उद्योग 15 फेब्रुवारी 2018 ला चार भागीदारांकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर त्याचे रुमित केमिसिंथ असे नामकरण करण्यात आले. संजय बाबूराव वाघ, महेश प्रणूभाई देसाई, अदित असित ध्रुवा, रूमा निखिल देसाई (सर्व रा. मुंबई) हे या कंपनीचे विद्यमान संचालक आहेत. ते रात्री उशिरापर्यंत शिरपुरात येणार असल्याचे सांगण्यात आले. औषधनिर्माण उद्योगासाठी आवश्‍यक असलेली रसायनांची या उद्योगात निर्मिती केली जाते. त्यासाठी बेन्झिन व अन्य रसायने येथे मागवून गुदामात ठेवली जातात व नंतर त्यावर प्रक्रिया केली जाते, असे व्यवस्थापनाने सांगितले. 

स्फोटाने हादरले शिरपूरकर 
आज सकाळी नऊला रुमित केमिसिंथमधील संयंत्रांचा स्फोट झाल्यावर सात किलोमीटर परिसरात त्याचा हादरा बसला. वाघाडी गावातील खिडक्‍यांची तावदाने फुटली. धाब्याच्या घरात माती खाली पडली. शहरासह लगतच्या भागातही दणका जाणवला. प्रारंभी गॅस गुदामात स्फोट झाला, पेट्रोलपंपाची टाकी फुटली, अशा अफवा पसरल्या. परिसरात शोध घेताना शिरपूर-शहादा रस्त्यावर धुराचे लोळ उठताना दिसून आल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुक्‍यात प्रथमच औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे शिरपूरकर सुन्न झाले आहेत.

loading image
go to top