esakal | काय सांगता...भुजबळांच्या नावे दुकानदारांकडे खंडणीची मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

shirpur chagan bhujabal

शिंगावे (ता. शिरपूर) येथील स्वस्त धान्य दुकानदार विजय नारायण सोनवणे यांच्या दुकानासमोर सोमवारी (ता. 13) दुपारी काळ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार येऊन उभी राहिली. तिच्यातून दोन महिला, एक पुरुष उतरले. रूबाबदार पोशाख केलेल्या तिघांसोबत शिंगावे येथील रहिवासी सुरेश युवराज पाटील देखील होता.

काय सांगता...भुजबळांच्या नावे दुकानदारांकडे खंडणीची मागणी 

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : "मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने आलो आहोत. तुमच्या दुकानाबाबत खूप तक्रारी आहेत,' असा दम देऊन स्वस्त धान्य दुकानदारांकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या नाशिक येथील तीन भामट्यांसह चार जणांविरोधात शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांत दोन महिलांचा समावेश आहे. 
शिंगावे (ता. शिरपूर) येथील स्वस्त धान्य दुकानदार विजय नारायण सोनवणे यांच्या दुकानासमोर सोमवारी (ता. 13) दुपारी काळ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार येऊन उभी राहिली. तिच्यातून दोन महिला, एक पुरुष उतरले. रूबाबदार पोशाख केलेल्या तिघांसोबत शिंगावे येथील रहिवासी सुरेश युवराज पाटील देखील होता. सोनवणे यांच्याकडे जाऊन संशयितांनी, आम्ही अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने दुकान तपासणीसाठी आल्याचे सांगितले. काही वेळ दुकानाचे दप्तर चाळल्यानंतर त्यांनी तुमच्या दुकानात मोठी अफरातफर झाली आहे. तुम्ही गोरगरिबांना धान्य वाटत नाहीत. प्रकरण मिटवायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, असा प्रस्ताव दिला. एव्हाना त्यांच्या हालचालींवरून दुकानदाराला संशय आला होता. त्यामुळे त्याने थेट तहसीलदार आबा महाजन यांना फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. तहसीलदारांनी तसे कोणतेही पथक आले नसून तपासणी नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे दुकानदाराने चौघांना थांबवून शेजारील लोकांना मदतीसाठी आवाज दिला. गर्दी जमत असल्याचे लक्षात येताच संशयितांनी कारमधून पळ काढला. मात्र काही युवकांनी मोबाईलद्वारे संशयितांचे छायाचित्र घेतले. त्यांच्यासोबत चौथा संशयित सुरेश पाटील गावातील रहिवासी असून, त्याच्या परिचितांकडून माहिती घेतल्यावर सोनल रसाळ (रा. नाशिक) या महिलेचे नाव निष्पन्न झाले. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत. 

भुजबळांशी पोलिसांचा संपर्क 
दरम्यान, येथील पोलिसांतर्फे नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली. अशा पद्धतीची तपासणी करण्यासाठी कोणतेही आदेश दिले नसून, श्री. भुजबळ यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांच्या संपर्क अधिकाऱ्यांनी दिले. 

संपादन : राजेश सोनवणे

loading image